जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता निधी वितरणास मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारने प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपयांची निधी वितरण करण्यात मंजूरी दिली असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख ५३ हजार २३५ शेतकऱ्यांना ६२६ कोटी २६ लाख रुपये मिळणार आहेत.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिक, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.
या शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर बाबींकरिता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची (३ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय झाला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान ६ लाख २६ हजार २६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याचा फटका ८ लाख ५३ हजार २३५ शेतकऱ्यांना बसला होता.
या शेतकऱ्यांसाठी शासनाने अतिरिक्त मदत म्हणून प्रति हेक्टरी दहा हजार प्रमाणे ६२६ कोटी २६ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १४७२ कोटी रुपये मंजूर
◼️ सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना ८४६ कोटी २६ लाख रुपयांच्या आर्थिक मदत १८ ऑक्टोबरला जाहीर केली होती.
◼️ यातील काही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान खात्यांवर जमा झाले आहे, तर काहींचे दिवाळीनंतर अनुदान जमा होत आहे.
◼️ यानंतर जून ते सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी शासनाने २१ ऑक्टोबरला आणखी २२ हजार ४३४ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३३ कोटी १९ लाखांचा निधी जाहीर केला होता.
◼️ आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १,४७२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
अधिक वाचा: E Pik Pahani: राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?
