Join us

शरीराच्या विविध अन्न घटकांच्या पूर्ततेसाठी परिपूर्ण असलेल्या गुणकारी अनानसाचे वाचा आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 08:44 IST

Health Benefits Of Pineapple : आज जाणून घेऊया याच गुणकारी अननस फळाचे विविध पोषणमूल्ये, अननसापासून तयार होणारे लोकप्रिय पदार्थ आदींची सविस्तर माहिती. 

अननस हे उष्णकटिबंधीय हवामानात उगम पावणारे फळ असून, त्याचा स्वाद आंबट-गोड आणि थोडासा तुरट असा असतो.

यामुळेच अननसाचा उपयोग अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. उन्हाळ्यात सहज मिळणारे आणि थंडावा देणारे हे फळ आरोग्यदृष्ट्याही खूप फायदेशीर आहे.

आज जाणून घेऊया याच गुणकारी अननस फळाचे विविध पोषणमूल्ये, अननसापासून तयार होणारे लोकप्रिय पदार्थ आदींची सविस्तर माहिती. 

अननसाचे पोषणमूल्य

अननसामध्ये व्हिटॅमिन C, ब्रोमेलेन नावाचे पचनास मदत करणारे एंजाइम, फायबर, आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचा ताजीतवानी ठेवते. तसेच पचनक्रियेस चालना देते.

अननसाचे पोषणमूल्य (१०० ग्रॅमसाठी अंदाजे)

घटक (Nutrition) प्रमाण (Amount)
ऊर्जा (Calories)५० किलो कॅलोरी
पाणी८६%
कार्बोहायड्रेट्स१३.१ ग्रॅम
साखर (नैसर्गिक)९.८ ग्रॅम
फायबर१.४ ग्रॅम
प्रथिने (Protein)०.५ ग्रॅम
मेद (Fat)०.१ ग्रॅम
व्हिटॅमिन C४७.८ मि.ग्रॅ. (80% RDA*)
व्हिटॅमिन Aथोडक्याच प्रमाणात
मँगनीज (Manganese)०.९ मि.ग्रॅ. (45% RDA*)
फोलेट (Folate)१८ मि.ग्रॅ. 
पोटॅशियम१०९ मि.ग्रॅ.
ब्रोमेलेन एंजाइमपचनासाठी मदत करणारे

अननसापासून तयार होणारे लोकप्रिय पदार्थ

अननसाचा रस : गोडसर आणि ताजेतवाना रस उन्हाळ्यातील थकवा दूर करतो. साखर, मीठ व बर्फ घालून बनवलेला रस पचनासही उपयुक्त ठरतो.

अननसाचा मुरांबा : साखरेत शिजवून बनवलेला हा गोड पदार्थ ब्रेड, पोळी किंवा पराठ्यासोबत खाण्यास योग्य असतो. तो दीर्घकाळ टिकतो आणि सणासुदीला विशेष करून बनवला जातो.

कॅन केलेल्या अननस : कॅन्ड अननस म्हणजे ताज्या अननसाचे स्लाइस, चंक्स (तुकडे), क्रश (वाटलेला), किंवा ज्यूसमध्ये ठेवलेले स्वरूप, जे साखरयुक्त सिरप किंवा स्वतःच्या रसामध्ये बंद केलेले असते. हे कॅन वायुरोधकपणे सील केलेले असल्यामुळे दीर्घकाळ टिकते.

अननस चटणी : अननस, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, साखर आणि लिंबाचा रस घालून तयार केलेली चटणी चव वाढवते. ही चटणी विशेषतः जेवणात मसाला म्हणून दिली जाते.

अननस पेस्ट्री व केक : पाश्चिमात्य पदार्थांमध्ये अननसाचा भरपूर वापर केला जातो. अननस अपसाईड डाऊन केक हा त्यातील एक प्रसिद्ध प्रकार असून त्यामध्ये अननसाचा स्वाद केकला एक वेगळी ओळख देतो.

अननस लोणचं : कोकण व केरळ भागात अननसाचे आंबट-गोड व मसालेदार लोणचं खूप प्रसिद्ध आहे. जेवणात विशेष चव येण्यासाठी याचा वापर होतो.

अननस चिप्स : अननसाचे चिप्स हे एक वेगळं, स्वादिष्ट आणि नैसर्गिक सॅक आहे. हे चिप्स बाजारात मिळतात, पण तुम्ही ते घरच्या घरी देखील अगदी सहजपणे बनवू शकता. यामध्ये साखर नसते (जर न घातली), तळले जात नाहीत आणि ते आरोग्यदायी ड्राय फ्रूट सारखे खाल्ले जाऊ शकतात.

अननस जॅम : अननस जॅम हा गोडसर, स्वादिष्ट आणि पोषणमूल्यांनी भरलेला पदार्थ आहे जो ब्रेड, पोळी, पराठा यांसोबत खाण्यास अत्यंत स्वादिष्ट लागतो. ताज्या अननसाचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून, त्यात साखर, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवले जाते.

• हे मिश्रण गाढसर होताच त्यात थोडी वेलदोडा पूड किंवा दालचिनी पूड घालून स्वाद वाढवता येतो. पूर्ण थंड झाल्यावर स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवावे. घरगुती अननस जॅम रासायनिक पदार्थांशिवाय बनवला जात असल्यामुळे तो आरोग्यासाठीही सुरक्षित असतो.

अननस वाईन : अननस वाईन ही फर्मेंटेशनच्या प्रक्रियेतून तयार केली जाते, जिथे अननसाचा रस यीस्टच्या साहाय्याने आंबवला जातो. ही वाईन सौम्य, आंबटगोड चव असलेली असते आणि ती सौंदर्यवर्धक, पचनास मदत करणारी आणि स्वादिष्ट अशी मानली जाते.

आरोग्य आणि स्वाद एकत्र

अननस हे फक्त एक फळ नाही, तर अनेक चवदार पाककृतींसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या चविनिहाय गुणधर्मांचा उपयोग करून आपण अननसाचे विविध खाद्यपदार्थ घरीही सहज तयार करू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्य आणि स्वाद एकत्र अनुभवण्यासाठी अननसाचा आहारात नक्की समावेश करा.

डॉ. सोनल रा. झंवरसाहाय्यक प्राध्यापकएम. जी. एम अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,गांधेली, छ. संभाजीनगर.

हेही वाचा : Healthy Jaggery Water : आरोग्याच्या विविध समस्यांना रामबाण उपाय; गुळाचे पाणी देई हमखास आधार

टॅग्स :फळेभाज्याआरोग्यशेती क्षेत्रहेल्थ टिप्सशेतीशेतकरीबाजार