अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यातील तब्बल १ हजार ५५५ गावांतील साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. किनवट आणि शिवणी तालुक्यांना अनुक्रमे ९ आणि ७ वेळा अतिवृष्टीने तडाखा दिला, पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबीही पावसाने दुःखाची फुले सोडली आहेत.
पावसामुळे झेंडूची फुले सडत असून काही ठिकाणी बागच आडवी झाली आहे. आदिवासीबहुल भागातील शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडले गेलेत. सरकारची बेफिकिरी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. जिल्ह्यातील ८८ मंडळांना अतिवृष्टीने पछाडले असून, अनेक ठिकाणी पिके सडली, तर काही ठिकाणी पिवळी पडली आहेत.
विशेषतः सोयाबीनवर 'यलो मोजॅक'चा अटॅक झाल्याने शेती हिवाळ्यात वाचेल की नाही, हा मोठा प्रश्न आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या दुहेरी अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान झाले. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांना उसंत दिलेली नाही. जमिनीत वापसा नाही, उघडीप नाही आणि हाती आलेली पिकंही सडली, अशा परिस्थितीत येणारी दसरा-दिवाळी शेतकऱ्यांसाठी काळीच ठरणार हे निश्चित आहे.
किनवट तालुक्यातील जलधारा मंडळात ९ वेळा तर शिवणीमध्ये सात आणि नांदेड तालुक्यातील नांदेड ग्रामीण, तरोडा आणि दाभड या तीन मंडळात सहा वेळा तसेच १० मंडळांमध्ये पाचवेळा अतिवृष्टीची नोंद झाली, त्याचबरोबर १८ मंडळात चारवेळा, ३१ मंडळात तीनवेळा आणि १३ मंडळात दोनवेळा अतिवृष्टीची नोंद आहे.
आमचे सगळे पीक गेले. सरकारने फक्त पाहण्या केल्या, त्यादेखील रस्त्यावरून, ज्या ठिकाणी खरे नुकसान झाले तिकडे कोणीच फिरकले नाही. मदत काहीच नाही. आम्ही दसरा-दिवाळी साजरी करायची तरी कशी? - नंदू जोगदंड, शेतकरी.
एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणाऱ्या मदतीचे क्रेडिट न घेता, तातडीने विशेष पॅकेज जाहीर करा. अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरणार नाही. शासनाचे हे वागणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. - डॉ. रेखा पाटील, काँग्रेस महिला आघाडी.