Pune : राज्यातील रब्बी हंगामाचा पेरा शेवटच्या टप्प्यात आला असून सरसराच्या तुलनेत ९९ टक्के आणि मागील वर्षीच्या तुलनेत ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर आता रब्बी पिकांवरच शेतकऱ्यांची अपेक्षा असून अनेक काही पिके जोमात वाढताना दिसत आहेत.
कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षाअखेरीस म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ५७ लाख ४६ हजार ४२३ हेक्टरवर रब्बी पिकांचे पेरणी पूर्ण झाली आहे. तर मागील पाच वर्षांचे रब्बी क्षेत्र हे ५७ लाख ८० हजार ४१७ हेक्टर एवढे आहे. विशेष म्हणजे यंदाच्या रब्बी हंगामात मक्याचे पेरणी क्षेत्र वाढले असून मागच्या वर्षीच्या तुलनेत १२३ टक्के तर मागील पाच वर्षीच्या तुलनेत १४१ टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे.
मक्याचे क्षेत्र का वाढले?
मक्याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून मागणी आणि दरची चांगला मिळताना दिसत आहे. इथेनॉलमुळे येणाऱ्या काळात मक्याचे दर स्थिर राहतील आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मक्यातून मिळेल अशी शक्यता असल्याने मक्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
रब्बी पीके - पेरणीखालील क्षेत्र (२०२५-२६)
- रब्बी ज्वारी - १ लाख २५ हजार ७५६ हेक्टर
- गहू - ११ लाख ८९ हजार १९३ हेक्टर
- मका - ५ लाख २८ हजार ७३४ हेक्टर
- हरभरा - २५ लाख ७४ हजार १९६ हेक्टर
- करडई - २६ हजार ७०८ हेक्टर
- इतर कडधान्ये - १ लाख ४५ हजार ९६५ हेक्टर
विभागनिहाय मक्याचे क्षेत्र किती टक्क्यांनी वाढले
विभाग - सरासरीच्या तुलनेत मक्याचे क्षेत्र
- कोकण - ८३ टक्के
- नाशिक - १३८ टक्के
- पुणे - १३३ टक्के
- कोल्हापूर - १४१ टक्के
- छ. संभाजीनगर - १४२ टक्के
- लातूर- १४२ टक्के
- अमरावती - १७२ टक्के
- नागपूर - २३० टक्के
