सागर कुटे
राज्यातील रब्बी हंगामाला सुरुवात झाली असली तरी पेरणीची गती मात्र खूपच संथ आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १० नोव्हेंबर २०२५ अखेर संपूर्ण राज्यात केवळ ९.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.
राज्याचे एकूण सरासरी रब्बी क्षेत्र ५७.८० लाख हेक्टर असल्याने, पेरणीचे प्रमाण अवघे १६ टक्के आहे. रब्बी हंगामात गेल्या वर्षी याच काळात ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यात जवळपास १५.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, जी सरासरीच्या २७ टक्के होती.
यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस होऊनही पेरणी क्षेत्रात तब्बल ६.१९ लाख हेक्टरने घट झाली आहे. हवामानातील विसंगती, आर्द्रतेची कमतरता आणि सिंचन व्यवस्थेतील अडचणी यामुळे पेरणीची गती कमी असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
कृषी विभागाचे आवाहन
उपलब्ध आर्द्रता, फवारणी योग्य स्थिती आणि सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच, हवामानात बदल थंडीचा जोर वाढल्याने रब्बी हंगामासाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे पेरणीला गती येईल, असा विभागाचा अंदाज आहे.
विभागनिहाय झालेली पेरणी
| विभाग | सरासरी पेरणी क्षेत्र | झालेली पेरणी (लाख हेक्टर) |
| अमरावती | ९.१३ | ०.६२ |
| नागपूर | ५.२६ | ०.१३ |
| छ. संभाजीनगर | ७.२८ | ०.८९ |
| लातूर | १५.०९ | २.९१ |
| नाशिक | ५.६७ | ०.४२ |
| पुणे | १०.८० | २.४२ |
| कोल्हापूर | ४.२४ | १.७४ |
| कोकण | ०.३३ | ०.१ |
पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याचा पेरणीवर परिणाम
राज्यातील अनेक पट्ट्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला पाऊस बरसला. त्यामुळे रब्बीतील पेरणीपूर्वीची शेती मशागतीची कामे खोळंबली. याचा परिणामी पेरणीवर झाला. कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मराठवाड्यात पेरणी सर्वात कमी असून, विदर्भात काही परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने मर्यादित प्रमाणात पेरणी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र व खान्देशात पेरणीचा वेग मंदावलेला आहे.
गहू, हरभरा, कांदा लागवडीला विलंब
यंदा गहू, हरभरा आणि कांदा या तिन्ही प्रमुख रब्बी पिकांच्या पेरणीत सर्वाधिक विलंब झाल्याचे समोर आले आहे. या पिकांना स्थिर आर्द्रतेची गरज असते, आर्द्रतेचा अभाव आणि रात्रीच्या वेळी मिळणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने पेरणी पुढे ढकलली जात आहे.
