Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; ३ दिवसांत ११५ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 08:59 IST

purandar vimantal पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक जमिनीपैकी सुमारे ३० टक्के जमीन करारनाम्याद्वारे संपादित करण्यात आली आहे.

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक जमिनीपैकी सुमारे ३० टक्के जमीन करारनाम्याद्वारे संपादित करण्यात आली आहे.

भूसंपादनाचा मोबदला वाटण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत ११५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत.

भूसंपादनाचा हा मोबदला मूळ शेतकऱ्यांनाच देण्यात येत असून अद्याप गुंतवणूकदारांना मोबदला देण्यात आलेला नाही.

शेतकऱ्यांना देण्यात असलेल्या नोटिसांमध्ये जमिनीचा दर शेतात असलेल्या फळझाडे, विहिरी, पाईपलाईन याचे मूल्यांकन देण्यात येत असून शेतकऱ्यांनी याबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

पुरंदरविमानतळासाठी सात गावांमधून १ हजार २१६ हेक्टर अर्थात ३ हजार ४० एकर जमीन संपादित केली जात आहे. बाधित शेतकऱ्यांना प्रतिएकर किमान एक कोटी ६१ लाख रुपये मिळणार आहेत.

त्यासाठी शेतकऱ्यांचे करारनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली आहे, अशा शेतकऱ्यांना करारनाम्यापूर्वी नोटीसा दिल्या जात आहेत.

त्यात जमिनीचा दर घर फळबागा, बोअरवेल, बाधित घर अशा बाबींना देण्यात येणारा मोबदला नमूद करण्यात आला आहे.

डुडी म्हणाले, सोमवारपासून मोबदला देण्यासाठी वेग आला असून आतापर्यंत ९२० एकर क्षेत्राचे करारनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

एकूण क्षेत्राच्या हे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सातही गावांमधून हे संपादन करण्यात आले आहे. मोबदल्याच्या नोटिसा सर्व गावांमधील शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

बोजा असा उतरविणार
◼️ शेतकऱ्यांकडे बँकांचे कर्ज असल्याने सातबारा उताऱ्यावर बोजा लावण्यात आला आहे.
◼️ अशा शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात भूसंपादन अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असून करारनाम्यावेळी बँकेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
◼️ ज्या संपादित क्षेत्रावर बोजा आहे, अशा क्षेत्राची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.
◼️ मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते वेळीच शेतकऱ्यांकडून या रकमेचा चेक बँकेच्या नावाने काढण्यात येत आहे

अफवांना ऊत, गुन्हे दाखल करणार
◼️ दरम्यान, मोबदला आणि संपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरल्या आहेत.
◼️ प्रकल्प रद्द झाल्यास मिळालेली रक्कम पंचवीस टक्के व्याजदराने राज्य सरकार वसूल करणार आहे.
◼️ संपादनासाठी जमीन उशिरा दिल्यास आणखी मोबदला वाढवून मिळेल अशा स्वरूपाची अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
◼️ मात्र, या अफवा खोट्या असून शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.
◼️ अशा अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी या अफवांना बळी पडू नये. अधिकृत माहिती वरच विश्वास ठेवावा असेही ते म्हणाले.

अधिक वाचा: कर्जमाफीच्या याद्या तयार; शेतकऱ्यांना 'या' बँकांकडून मिळणार सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ

English
हिंदी सारांश
Web Title : Purandar Airport Land Acquisition Accelerated; ₹115 Crore Deposited to Farmers

Web Summary : Land acquisition for Purandar Airport speeds up. ₹115 crore has been directly deposited into farmers' accounts in three days. The compensation is for original landowners. Farmers should ignore rumors, says Collector. 30% land acquired.
टॅग्स :विमानतळपुणेशेतकरीशेतीपुरंदरजिल्हाधिकारीबँकपीक कर्जफळे