रूपेश उत्तरवार
राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, ही कर्जमाफी कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यानुसार, विदर्भातील तीन लाख ५३ हजार ५५१ शेतकऱ्यांकडे तीन लाख ४७ हजार ७२२ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. अद्याप ८२ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांनी माहिती बँकांकडे सादर केलेली नाही.
शेतकरी कर्ज निवारण योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांकडे कुठल्या वर्षापासून कर्जाची थकबाकी आहे, हे कर्ज अल्पमुदती, मध्यम मुदती की दीर्घ मुदती यापैकी कुठल्या प्रकारात मोडते याचा शोध या मोहिमेतून घेतला जात आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक आणि इतर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सोसायटी सचिवांकडून करण्यात येत आहे. सचिव मंडळी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ही माहिती घेत आहेत.
यानंतरही अनेक थकबाकीदार शेतकरी या मंडळींना गवसली नाहीत. यासाठी आता गावपातळीवर विशेष कॅम्प घेऊन अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांच्या नेतृत्वात होत आहे.
सहकार विभागाचे पथक गावांमध्ये धडकले
• याच अनुषंगाने ते शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यात मुक्कामी आहे. गावपातळीवर जाऊन याचे वास्तव शोधून काढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. याशिवाय या शोधमोहिमेत विविध तीन पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
• यामध्ये जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, देखरेख मुख्याधिकारी अजित डेहणकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या नेतृत्वात ही टीम काम करीत आहे.
मयत, गाव सोडून गेले, योजनेची माहितीच नाही
या शोधमोहिमेत थकबाकीदार शेतकरी मृत असल्याची बाबही पुढे आली आहे. तर काही शेतकरी गाव सोडून गेले आहेत. काही शेतकरी रोजमजुरीच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी काम करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांना या योजनेची कुठलीही माहिती नाही.
थकबाकीदार शेतकरी
| जिल्हा | थकीत | रक्कम |
| यवतमाळ | १,२९,११९ | १,३३,५१३ |
| अमरावती | ७०,२५३ | ७०,८३०.५९ |
| अकोला | ५५,२०० | ६०,१७२.५० |
| वाशिम | ५५,५९१ | ६०,११५.६५ |
| बुलढाणा | २५,३०० | २३,१००.९९ |
| एकूण | ३,३५,४६३ | ३,४७,७२२.७३ |
