मंचर : यंदाच्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील बटाटा लागवडीवर मोठा परिणाम झाला असून, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाणाच्या विक्रीत तब्बल २५० ट्रकची घट झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना सुमारे साडेसात कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकरी आता बटाट्याऐवजी कांदा लागवडीकडे वळल्याने भविष्यात बटाट्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची शक्यता आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील बटाटा वाणाची प्रमुख बाजारपेठ आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, नांदेड, पुणे यासह राज्यभरातील शेतकरी येथे बटाटा वाण खरेदीसाठी येतात.
खरीप आणि रब्बी हंगामासाठी येथे वाण उपलब्ध असते, विशेषतः रब्बी हंगामात बटाटा वाणाची सर्वाधिक विक्री होते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे बटाटा लागवडीचे क्षेत्र घटले आहे.
दरवर्षी बाजार समितीत पंजाबमधून सुमारे १००० ट्रक बटाटा वाणाची आवक होते, परंतु यंदा केवळ १५० ट्रक वाण उपलब्ध झाले.
मध्यंतरीच्या सततच्या पावसामुळे तीन आठवडे बटाटा वाणाची विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे उपलब्ध वाणाची सड झाली आणि व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांची वाट पाहत बसावे लागले.
शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल
◼️ अतिवृष्टीमुळे जमिनीत ओल जास्त आहे. वापसा झाल्यावर काही शेतकरी बटाटा लागवड करू शकतात, असे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र भंडारी यांनी सांगितले.
◼️ ते म्हणाले, पुखराज जातीचा बटाटा वाण दोन ते अडीच महिन्यांत उत्पादन देतो, त्यामुळे शेतकऱ्यांची त्याला पसंती आहे.
◼️ पंजाबमध्ये १६ प्रकारचे बटाटा वाण उत्पादित होतात, पण शेतकऱ्यांचा कल पुखराजकडेच आहे.
◼️ मात्र, सध्याच्या परिस्थितीत स्थानिक शेतकरी बटाट्याऐवजी कांदा लागवडीकडे वळत असल्याने बटाट्याचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.
वाणाच्या दरात वाढ
◼️ गेल्या आठवड्यात बटाटा वाणाला प्रतिक्विंटल २३०० रुपये दर होता.
◼️ मात्र, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल येथेही अतिवृष्टीमुळे बटाटा लागवड वाया गेल्याने पुन्हा दुबार लागवडीसाठी वाणाची मागणी वाढली आहे.
◼️ पंजाबमधील 'पुखराज' या बटाटा वाणाचे उत्पादन मर्यादित असल्याने टंचाई निर्माण झाली आहे.
◼️ परिणामी, मंचर बाजार समितीत बटाटा वाणाचा दर प्रतिक्विंटल ३००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी संजय मोरे यांनी व्यक्त केली.
भविष्यात टंचाई?
◼️ बटाटा लागवडीचे क्षेत्र घटल्याने आणि वाणाच्या विक्रीत झालेल्या कमतरतेमुळे भविष्यात खाण्याच्या बटाट्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. यामुळे बटाट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
◼️ मंचर बाजार समितीत दररोज शेतकरी आणि व्यापारी बटाटा वाण खरेदी-विक्रीसाठी येत असले तरी यंदाच्या हंगामात अतिवृष्टीने गणित बिघडले आहे
१५० ट्रक बटाटा वाण यंदा उपलब्ध
दरवर्षी बाजार समितीत १००० ट्रक बटाटा वाणाची आवक होते, यंदा केवळ १५० ट्रक वाण उपलब्ध झाले. मध्यंतरीच्या पावसाने तीन आठवडे बटाटा वाण विक्री पूर्णपणे ठप्प झाली.
अधिक वाचा: गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर; यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन ३४०० शक्य