थंडी, पोपटी पार्टी आणि त्यामागील व्यवसाय यांचा परस्परांशी घट्ट संबंध आहे. थंडीमुळे या पार्थ्यांची मागणी वाढते, आणि मागणीमुळे व्यवसाय वाढतो.
म्हणूनच आज पोपटी पार्टी ही केवळ चवीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. थंडी सुरू झाली की महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये एक वेगळीच उत्साहाची लाट पसरते.
याच काळात रायगड जिल्ह्यात विशेषकरून पेण, सुधागड, अलिबाग आणि उरण तालुक्यामध्ये पोपटी पार्टीची रेलचेल सुरू होते. थंडी, शेकोटी आणि मातीच्या मडक्यात शिजणारी आपल्या आवडीचा जिन्नस यांचा संगम म्हणजे पोपटी पार्टी.
ही केवळ जेवणाची पद्धत नसून, ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आता व्यावसायिक स्वरूप धारण करणारी परंपरा बनली आहे.
पोपटी म्हणजे शेतात मिळणाऱ्या ताज्या भाज्या-वालाच्या शेंगा, बटाटे, कांदे, रताळी, मक्याची कणसे, तसेच इतर आवडीच्या भाज्या आणि पनीर या सर्व घटकांना मसाल्यांनी मॅरिनेट केले जाते.
या पोपटीमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतात सहज उपलब्ध होणारा भांबुर्डीचा पाला. त्यानंतर एका मडक्यात तळाला भांबुर्डीचा पाल्याचा थर त्यावर शेंगा पुन्हा पाला मग पनीर आणि इतर भाज्या असे एकावर एक असे तीन ते चार थर लावले जातात.
सोबतीला जाडे मीठ आणि ओवा टाकला जातो. हे मडके भरल्यावर त्याचे तोंड पाल्याचा जाड थर आणि ओल्या मातीने बंद करून ते उपडे ठेवतात. त्याच्या आजूबाजूला पालापाचोळा आणि लाकडे रचून शेकटी पेटवली जाते.
थंडीच्या रात्री शेकोटीभोवती बसून मित्र-परिवारासोबत गप्पा मारत पोपटी खाण्याची मजा काही औरच असते थंड हवामानामुळे शेकोटीची ऊब आणि गरमागरम पोपटी यांचा अनुभव हा शहरवासीयांना अधिकच खास वाटतो.
पूर्वी पोपटी पार्टी ही गावाकडे किंवा शेतात घरगुती पातळीवर केली जात असे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि शहरातील नागरिकांना ग्रामीण राहणीमानाबाबत वाढलेल्या आकर्षणामुळे पोपटी पार्टीने व्यवसायाचे रूप घेतले आहे.
आज अनेक शेतकरी, रिसॉर्ट मालक, ढाबे आणि पर्यटन व्यावसायिक थंडीच्या हंगामात खास पोपटी पार्टीचे आयोजन करतात. साधारणपणे रिसॉर्ट आणि फार्महाऊस मालक एका व्यक्तीमागे पोपटी पार्टीसाठी १२०० ते २००० रुपये आकारतात.
तर थोड्याफार अधिक सुविधा असलेल्या फार्महाऊसमध्ये हा दर २५०० रुपयांपर्यंत असतो. त्यामुळे थंडीच्या मोसमातील या पोपटी पार्टीमुळे साधारणपणे काही लाखांच्या घरात उलाढाल होते.
पोपटीचा हंगाम खऱ्या अर्थाने दिवाळी संपल्यानंतर सुरू होतो. शहरातील लोक थंडीच्या दिवसांत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी अशा पोपटी पार्ट्यांना पसंती देतात.
यामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळते. कमी भांडवलात केला जाणारा हा व्यवसाय थंडीच्या हंगामात चांगला नफा देऊन जातो.
कुणाला आणि कसा मिळतोय रोजगार?
१) विशेष मडक्यांचा बाजार
पोपटी पार्टीसाठी मातीच्या मडक्यांना विशेष मागणी असते. स्थानिक कुंभारांसाठी हा थंडीचा हंगाम सुवर्णसंधी ठरतो. मोठ्या प्रमाणावर पोपटी पार्टी आयोजन करणारे व्यावसायिक मडकी थेट गावातून खरेदी करतात, ज्यामुळे पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना मिळते आणि हस्तकलेचे जतनही होते. साधारणपणे या मडक्यांचा दर दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत असतो.
२) शेती उत्पादनांना थेट बाजारपेठ
पोपटी पार्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट ग्राहक मिळतो. ताजी, सेंद्रिय आणि हंगामी उत्पादने ही पोपटी पार्टीची खास ओळख बनली आहे.
३) जवळील गावातील खास कडव्या वालाच्या शेंगा
पोपटीसाठी जवळील गावातील कडव्या वालाच्या शेंगांना मोठी मागणी असते. त्यांच्या चवीमुळे आणि स्थानिक ओळखीमुळे या शेंगांना अनेक जण पहिली पसंती देतात.
४) इतर भागातही वेगळ्या नावाने ओळख
पोपटी ही जरी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असली तरी हा प्रकार रत्नागिरीसह उत्तर कोकणात पालघर आणि गुजरातच्या वलसाड अशा काही भागांत केला जातो. रत्नागिरी आणि आसपासच्या भागात त्याला उकडहंडी, तर गुजरातमध्ये त्याला उंबाडिओ असे म्हटले जाते.
- कल्पेश पोवळे
उपसंपादक
अधिक वाचा: तांदूळ निर्यातीला येणार चांगले दिवस; भारतीय तांदूळसाठी टॅरिफ सवलत कशी ठरणार लाभदायक?
