नवनाथ जगदाळे
दहिवडी : आंधळी गाव एकेकाळी केळी, पेरूच्या बागांसाठी प्रसिद्ध होते. आता येथील शेतकऱ्यांच्या विविध फळबागाही दिसत असून, यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.
अशाच प्रकारे प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच सुधाकर काळे यांनीही अवघे १० गुंठे क्षेत्र डाळिंबाखाली आणले. तसेच दुसऱ्या वर्षीच १५० झाडांमध्ये दोन टन उत्पादन घेऊन दोन लाखांचे उत्पन्नही मिळवले.
त्यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आंधळी येथील सुधाकर काळे यांची देशी केळीची बाग आहे. ते स्वतः बाजारात केळी विकतात. आले व कांदा पीकही घेत होते.
मात्र, या पिकांमध्ये म्हणावे असे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी दोन वर्षांपूर्वी डाळिंब रोपाची लागण केली. त्यासाठी १० गुंठे क्षेत्र निवडले. त्यामध्ये सुमारे १५० झाडे लावून चांगल्या पद्धतीने जोपासली.
शेतकरी सुधाकर काळे यांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या वर्षी या डाळिंबामध्ये कांदा पिकाचे आंतरपीकही घेतले होते. त्याचाही त्यांना चांगला फायदा झाला. डाळिंब हे फायद्याचे असून, आणखीही बाग लागवड करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला आहे.
दोन लाख रुपयांचे उत्पन्न
२ टनापेक्षा जास्त डाळिंबाचा माल नुकत्याच केलेल्या तोडणीतून निघाला आहे. डाळिंबाचा दर थोडा कमी होऊनही दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. तसेच त्यांनी आपली बाग ही जागेवरच व्यापाऱ्याला विक्रीसाठी दिली हे विशेष.
सर्वच शेतकरी पारंपरिक पध्दतीने शेती करतात. खऱ्या अर्थाने अशी शेती परवडत नाही. यासाठी शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे. मी केळी, आले, बटाटा आणि कांदा याचे उत्पादन घेत होतो. मात्र, डाळिंबबागेने चांगली साथ दिली. आणखी डाळिंब बाग वाढवण्याचा माझा विचार आहे. - सुधाकर काळे, शेतकरी, आंधळी
अधिक वाचा: पावसाचा मुक्काम वाढला, द्राक्ष हंगाम लांबणीवर पडला अन् द्राक्षबागायतदार मेटाकुटीला आला