जळगाव जिल्ह्याच्या वडगाव, चिनावल (ता. रावेर) व परिसरातील शेतकऱ्यांचे केळी पीक कापून टाकण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
आमदार अमोल जावळे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिस प्रशासनाला कठोर उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सावदा व निभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
रात्रीच्या गस्तीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. तीन टप्प्यांतील गस्त पथकांसोबत गुप्त पोलिसांमार्फत शेती शिवारात फेरफटका मारण्यात येत आहे. दरम्यान गेल्या ३ वर्षात वडगाव, चिनावल शिवारात केळी पीक कापणे, शेती साहित्य चोरी, शेतातील नासधूस यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे हेही विशेष.
शेती पिकाच्या नुकसानीबाबत गुन्हा
• गेल्या दोन ते तीन वर्षात केळी पीक कापणे, शेती साहित्य चोरी करणे, शेतातील नासधूस यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे एकत्रितपणे निवेदन देत अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली होती.
• पोलिस प्रशासनाने तत्काळ हालचाली करून पेट्रोलिंग वाढवले असून, अलीकडील नुकसानीच्या घटने प्रकरणी निभोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सपोनि हरिदास बोचरे यांनी दिली.
संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधा
• रात्रीच्या वेळेत पीक कापण्याच्या घटना घडत असल्यामुळे, त्या वेळेतील मोबाईल लोकेशन तपासणे, तसेच शिवारात संशयित हालचालींवर गुप्त नजर ठेवून तपास करण्यात येत आहे. सुकी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवरही पोलिस नजर ठेवून आहेत.
• या वाढीव गस्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, लवकरच या गैरकृत्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शिवारात कोणतीही संशयित हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांच्या नावाची गोपनीयता राखली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.