नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) दुसरा टप्पा सुरू होण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले असले तरी अद्यापही या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी या महत्त्वाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
पहिल्या टप्यात मिळालेल्या प्रचंड यशानंतर मात्र आता दुसऱ्या टप्प्याला विलंब होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील ४६० गावांचा समावेश होता.
या योजनेने शेतकऱ्यांच्या शेती पद्धतीत मोठे बदल घडवून आणले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात गावांची संख्या कमी करून ३१९ इतकी करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचे अनुदान, ७० हजार शेतकऱ्यांचा फायदा
• पोकरा योजनेचा पहिला टप्पा २०१८ ते २०२३ या पाच वर्षाच्या काळात यशस्वीपणे राबवला गेला. जळगाव जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकऱ्यांना या काळात सुमारे ४९९ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. या अनुदानातून शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली.
• पहिल्या टप्प्यातील या मोठ्या यशानंतर दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, वर्ष उलटूनही योजना सुरू न झाल्याने दुसऱ्या टप्प्याला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'अशी' आहे योजना
• या योजनेतून शेतकऱ्यांना कृषी अवजारे बँक, शेड आणि शेतीमालावर प्रक्रिया केंद्रे यांसारख्या सामूहिक प्रकल्पांसाठी २० लाख रुपयांपर्यंतचे प्रस्ताव सादर करता येतात.
• या प्रकल्पांसाठी ६० ते ८० टक्केपर्यंत अनुदानही दिले जाते.
• मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हे प्रस्ताव केवळ कागदावरच राहिले आहेत.