खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले असेल तर रब्बी पेरणीसाठी मदत म्हणून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे अपेक्षित असते. सध्या बीड जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, नवीन वर्ष सुरू झाले आहे.
असे असूनसुद्धा मागच्या वर्षातील म्हणजेच खरीप २०२४ मधील पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याबाबत कृषी विभागाने तत्काळ पीक विमा कंपनीला सूचना देऊन याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
बीड जिल्ह्यातील नऊ लाखांवर शेतकरी पीक विमा अग्रिमच्या प्रतीक्षेत आहेत. १ जूननंतर चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस होताच पेरण्या पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे यावर्षी पीकविमा भरण्यास लवकरच सुरुवात झाली होती.
जुलैअखेर, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. १ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.
महसूल, कृषी विभाग, विमा कंपनीच्यावतीने त्यावेळी पंचनामे करण्यात आले होते. पंचनामे पूर्ण होताच विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली होती. त्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा लाभ देणे उचित नव्हते.
त्यामुळे विमा अग्रिम शेतकऱ्यांना देण्यात आला नव्हता, परंतु आता नवीन कृषिमंत्री नियुक्त झाले तरी पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तत्काळ पीक विमा अग्रिम द्यावा अशी शेतकऱ्यांतून मागणी होऊ लागली आहे.
'या' आठवड्यात होणार बैठक
• खरीप २०२४ मध्ये १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ९ लाख ८१ हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत. यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात ६ लाख ७८ हजार तर वैयक्तिक या प्रकारात ३ लाख शेतकरी आहेत.
• या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले की, पीक विमा अग्रिम संदर्भाने या आठवड्यात बैठक घेतली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना विमा अग्रिम दिला जाईल.