सोलापूर : गेल्या वर्षी ४ जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते.
शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी (इंटिमेशन) नुसार जिल्ह्यातील दोन लाख ११ हजार ६६३ शेतकऱ्यांना २८२ कोटी १९ लाख रुपये पीक विमा कंपनी देणार आहे. प्रत्यक्षात पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे व शासन हिस्सा जमा करण्यासाठी कालावधी ठरला आहे, मात्र विमा कंपनीकडून नुकसानभरपाई देताना कंपनीच्या सोईने दिली जाते.
शासनाकडून विमा कंपनीला जमा होणाऱ्या रकमेपैकी किती टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली जाते?, याचा तर हिशोब न विचारलेला बरा. कारण, पीक विमा कंपनीच्या सोईने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. यंदाही असेच झाले आहे.
पुढील खरीप हंगाम दोन अडीच महिन्यांवर आला असला, तरी मागील खरीप हंगामाची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. आता पुढील आठवड्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगितले जात असले, तरी रक्कम जमा झाल्याशिवाय खरे नाही.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती (पीक उभा असताना नुकसान) व पोस्ट हार्वेस्टिंग (पीक काढून ठेवल्यानंतर नुकसान) झाल्याच्या तक्रारीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
दोन्ही प्रकारच्या तक्रारींचे जवळपास दोन लाख ११ हजार ६६३ शेतकऱ्यांना २८२ कोटी १९ लाख रुपये वाटप करण्यात येतील असे विमा कंपनीकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम मिळणार असून, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, माढा व मंगळवेढ्याला घसघशीत रक्कम मिळणार आहे. पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्याला इतर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी रक्कम मिळणार आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण : भोसले
मागील खरीप हंगामात सलग पावसाने उभ्या पिकांचे व काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे शेतकऱ्यांकडून आलेल्या इंटिमेशनप्रमाणे विमा कंपनीने पंचनामे केले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर रक्कम जमा करण्याबाबत विमा कंपनीशी बोलणी झाली. त्याप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
मागील खरीप हंगामातील पीकांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारने हिस्स्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा केली होती. राज्य शासनाकडून उर्वरित रक्कम मिळाल्याने आता खरीप पीक नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापर्यंत पीक विमा रक्कमेची प्रतीक्षा करावी लागेल. - विनायक दीक्षित, इन्शुरन्स कंपनी
मागील जुलै महिन्यात पीक विम्यापोटी एक रुपया भरला होता. ऑगस्ट महिन्यापासून पीक नुकसानीच्या इंटिमेशन देत आहोत. विमा कंपनीने लोक त्यांच्या सोईने पंचनामे करून गेले. नुकसानभरपाई मात्र मिळाली नाही. आता पुढील खरीप हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. विमा कंपनीकडून सर्वच इंटिमेशन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. - मनोज साठे, शेतकरी, वडाळा
अधिक वाचा: दुष्काळी जत भागात या शेतकऱ्याने केशर आंबा पिकातून केली क्रांती; वाचा सविस्तर