पुणे : यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयाची सवलत रद्द केल्यानंतरही तब्बल ९१ लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.
गेल्या वर्षी ही सवलत लागू असताना १ कोटी ६८ लाख शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला होता. यंदा त्या तुलनेत ही संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.
मात्र, शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेल्या नुकसानभरपाईच्या आधारेच या योजनेतील सहभागाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नांदेड जिल्ह्यातील ८ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी सर्वाधिक सहभाग नोंदविला आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीची मुदत संपली असली तरी कर्जदार शेतकऱ्यांसाठीची मुदत ३१ ऑगस्ट आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
यंदा एक रुपयात विमा हप्ता सवलत बंद करणे, नुकसानभरपाईचे निकष बदलणे, पीक पाहणी आणि ॲग्रीस्टॅकमधील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करणे, या कारणांमुळे योजनेतील सहभागी शेतकरी संख्या घटणार, असा अंदाज कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.
मात्र, यापूर्वी २०१६ मध्ये पीककापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई देण्यात आली होती. तरीदेखील त्या वर्षी राज्यात ६३ लाख ६४ हजार ३०८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
यामुळे यंदा शेतकऱ्यांची नोंदणी वाढावी यासाठी व ही नोंदणी किमान ६४ लाख व्हावी, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.
अर्जाची संख्या
कोकण - १,०५,०३६
नाशिक - ८,७१,८८४
पुणे - ७,९८,९४८
कोल्हापूर - १,९१,९४०
छ. संभाजीनगर - २३,७१,७९६
लातूर - २८,७२,७९७
अमरावती - १५,००,२५७
नागपूर - ४,०४,६३४
एकूण - ९१,१७,२९२
५३२ कोटींचा हप्ता जमा
◼️ राज्यात आतापर्यंत २१ लाख १७ हजार २९२ शेतकऱ्यांनी ५८ लाख ४८ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.
◼️ तर ३१ हजार ३७९ कोटी रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली आहे.
◼️ शेतकऱ्यांनी ५३२ कोटी ९७ लाख रुपयांचा विमा हप्ता जमा केला करण्यात आला आहे.
अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर