ऑगस्ट महिन्यात विविध भागात अतिवृष्टी झालेली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
त्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. अमरावती जिल्ह्यात जून, जुलै महिन्यासह ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आहे.
यामुळे शेतपिके बाधित झालेली आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात ४४ हजार ५८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यात २७२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन, धान, मका आदींचे नुकसान झाले आहे.
ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित ५३ कुटुंबातील २१६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ८९६ घरांची अंशतः पडझड झाली आहे, तर १४ घरांची पूर्णता पडझड झाली आहे.
आठ झोपड्या, गोठ्यांची पडझड झाली असून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच २४ लहान, तर १९ मोठे जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
शेतपिकांच्या नुकसानीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाते आहे. यासाठी शासन स्तरावर पंचनामे सादर होणे आवश्यक आहे.
त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच या पंचनाम्यापोटी आवश्यक असणाऱ्या मदतीच्या रकमेची मागणी शासनाकडे नोंदवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
अधिक वाचा: साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई