दत्ता पाटील
तासगाव : पीजीआर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराची गंभीर दखल खते व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी घेतली आहे.
चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा इशारा बोरकर यांनी दिला आहे. शासनाचा पगार घेऊन कंपनी चालवत असल्याचे आढळल्यास दोषी कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले.
द्राक्ष उत्पादक, फळे, भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकडे शेतीत राबून मिळणाऱ्या पैशाला, त्यांच्या खिशातून बेइमानपणे काढून घेण्याची व्यवस्था तयार झाली. कंपनीपासून शेतकऱ्यांपर्यंत औषध पोहोचवण्यासाठी लुटारूंची साखळी तयार झाली.
गैरव्यवस्थेचा पर्दाफाश
या भ्रष्ट आणि गैरव्यवस्थेचा पर्दाफाश 'लोकमत'च्या 'पीजीआरचा फंडा अन् शेतकऱ्यांना गंडा' या मालिकेतून करण्यात आला. या मालिकेचे राज्यभरातील शेतकऱ्यांनी चांगलेच कौतुक केले. त्यांना येणाऱ्या अडचणींचा आणि झालेल्या फसवणुकीचे अनेक कारनामे 'लोकमत'ला सादर केले. या मालिकेची धास्ती कंपन्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच घेतली आहे. त्याची दखल आता राज्याच्या खते व गुण नियंत्रण कृषी संचालकांनीही घेतली आहे.
अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई
१) पीजीआर कंपनीच्च्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे आढळल्यास दोषी कंपनीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला आहे.
२) याबाबत त्यांनी संबंधित मुख्य गुण नियंत्रक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, काही अधिकारी स्वतःच बगलबच्च्यांच्या नावावर भागीदारीत कंपन्या चालवत आहेत.
३) त्याची दखल घेत संबंधित कृषी अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही बोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला आहे.
मी राज्याच्या कृषी आयुक्तांकडे पीजीआर उत्पादने कायद्याच्या कक्षात आणावीत म्हणून संघटनेमार्फत मागील १० वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, अजूनही ते प्रलंबित आहे. द्राक्ष सल्लागार या पदासाठी किमान कृषी पदवीची अट असावी, यासाठी तत्कालीनमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे मागणी केली आहे; परंतु राजकीय नेते याकडे कानाडोळा करीत आहेत. शेतकरी वर्गाला गृहीत धरून राजकारण केले जातेय. यासाठी शेतकरी एकजुटीची गरज आहे. - बाबूराव जाधव, उपाध्यक्ष, माफदा, राज्य संघटना
अधिक वाचा: पीजीआर कंपनीच्या माध्यमातून झटपट श्रीमंती; नातेवाइकांच्या नावावरच अधिकाऱ्यांनी सुरु केल्या कंपन्या