पुणे: देशातील पहिली आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकॅथॉन पुण्यात जूनमध्ये आयोजित करण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन येथे शनिवारी (दि. ५) या हॅकॅथॉनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धकांना वातर ५ मे पर्यंत अर्ज करता येतील. आलेल्या अर्जाची पडताळणी करून स्पर्धकांची यादी १५ मेपर्यंत अंतिम करण्यात येईल.
जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहात अॅग्री हॅकॅथॉन स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली.
ते म्हणाले की, ही स्पर्धा जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, कृषी महाविद्यालय व आत्मा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येत आहे.
स्पर्धेकरिता कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधान संस्था, संशोधन केंद्रे यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर आदी संस्था यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत.
यात कृषी व तंत्रज्ञान शाखांचे विद्यार्थी, संगणक अभियंते आदी स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवतील.
कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारांत वर्गीकरण- कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले असून, त्यावर स्पर्धकांनी उपाययोजना (सोल्युशन) शोधायचे आहे. सर्वोत्तम उपाययोजना सादर करणाऱ्या स्पर्धकांची प्रत्येक गटामध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिकाकरिता तज्ज्ञ समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे. प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले आईल. - अॅग्री हॅकॅथॉन ही एक अभिनव संकल्पना असून, त्याद्वारे शेतीतील काढणी पश्चात होणारे नुकसान, खतांचा काटेकोर वापर, पाण्याचा कार्यक्षम वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापराद्वारे अनेक समस्यांवर उपाययोजना शोधून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मदत होणार आहे.
नाव नोंदणीसाठी वेबसाईट: https://www.puneagrihackathon.com/