धामोरी : कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील ३३ शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काढणी केलेले व काढणीला आलेले मकापीक अवकाळी पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाले होते.
या आपत्तीला सात महिने उलटून गेले. कृषी व महसूल विभागाच्या पथकाने शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर केला.
मात्र, जानेवारी महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पिकांचे नुकसान झाले होते.
मदतीच्या आशेवर दिवस ढकलणारे शेतकरी आता अधिकच हवालदिल झाले आहेत. कोपरगाव तालुक्यात शेतकरी रब्बी हंगामात उसाबरोबरच मका, गहू, कांदे यांसारखी पिके घेतात.
मे महिन्यात नेमक्या काढणीच्या टप्प्यावर मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतातली पिके कुजली, मक्याच्या कणसांना कोंब फुटले. शेतकऱ्यांचे महिनोंमहिन्याचे श्रम तसेच खतांचा, मजुरीचा व मशागतीचा खर्च वाया गेला.
पीक गेल्याने घरखर्च, कर्ज फेड आणि खरिपासाठी लागणारा खर्च भागवणे कठीण झाले होते. त्यात अतिवृष्टीने खरिपाचे नुकसान झाले.
त्यामुळे शेतकरी मोठ्या दुहेरी आर्थिक संकटात सापडलेला असताना आता परत रब्बी हंगामासाठी उसनवारी, कर्ज काढावे लागत आहे.
त्यामुळे शासनाने पंचनाम्याच्या आधारे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाच्या गतिमानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर तत्काळ मदत देतो, अशी आश्वासने सरकारकडून दिली जातात; परंतु, प्रत्यक्षात मदत मिळायला महिने, वर्ष लागतात.
शेतकऱ्यांचा प्रश्न कायम..
पिके गेली, श्रम वाया गेले, कर्जाचे ओझे वाढले, तरीही शासनाची मदत अद्याप मिळालेली नाही. मे महिन्यातील आपत्तीला आज सात महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही आलेला नाही. त्यामुळे शेतकरी विचारतोय पंचनामा झाला, ई-केवायसी केली, मदत कधी?
हातातोंडाशी आलेले मका पीक शेतातच राहिले. तोडून टाकलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटले. खत, मजुरी, बियाणे यांचा खर्च पाण्यात गेला. पंचनामा झाला, ई-केवायसी केली; पण, अजून मदत मिळाली नाही. नुकसान भरपाई न मिळाल्यास चालू हंगामाचा लागणारा खर्च भागविणे अवघड होईल. - आप्पासाहेब गाडे, नुकसानग्रस्त शेतकरी
अधिक वाचा: हिवाळ्यात नारंगी गाजर खावे की लाल? कोणत्या गाजराचे काय फायदे? जाणून घ्या सविस्तर
