नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील खारी फाटा येथील एका कांदा अडतदाराने राजस्थान येथे विक्रीसाठी एका वाहनात पाठवलेल्या १२ लाख ५ हजार ३४२ रूपये किमतीच्या कांद्याचा अपहार करून कांदा अडतदाराची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात कांदा अडतदार हरिदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, कांदा अडतदार हरिदास चिंतामण जाधव (रा. महात्मा फुले नगर, खारीपाडा, ता. देवळा) यांची खारी फाटा येथे हरिदर्शन ट्रेडर्स या नावाने कांदा अडत दुकान आहे. कांदा मार्केटमध्ये लिलावात कांदा खरेदी करून तो राजस्थान येथे विक्रीसाठी पाठविला जातो.
तेथे कांदा विक्री झाल्यानंतर अडतदार जाधव यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात. परस्पर विश्वासावर असा व्यवहार होत असल्याने तीन महिन्यांपूर्वीही व्यापाऱ्याबरोबर जाधव यांनी अशाच प्रकाराचा विश्वासाने व्यवहार केला. जाधव यांनी नेहमीप्रमाणे दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी संशयित सुरेशकुमार पारीख (रा. रामस्वरूप पार्क, जोधपूर, राजस्थान) यांच्याकडे आर. के. रोडलाईन्स ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ट्रकमधून कांदा पाठविला होता. हा कांदा त्यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या (आरजे/१९/ जीएफ / ४६४१) वाहनाने पाठविला होता.
बाबुराव हुडा, कृषी फर्म, ओसीया मथानिया, जोधपूर, राजस्थान या फर्मच्या नावाने पावती करून ३० टन ५१५ किलो कांदा राजस्थानकडे रवाना केला होता. जाधव यांनी बाजारभाव ३९ रूपये ५० पैसे प्रति किलोप्रमाणे १२ लाख ५ हजार ३४२ रूपये किमतीचा कांदा विश्वासाने विक्री करण्याकरिता सुपूर्द केला होता.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
• व्यवहारापोटी जाधव यांच्या खात्यावर पैसे येणे अपेक्षित होते. परंतु, वाट पाहूनही त्यांच्या खात्यावर पैसे आले नसल्याने त्यांनी याबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांना शंका आली. वारंवार चौकशी करूनही कांद्याचा परतावा मिळत नसल्याने जाधव यांनी फिर्याद दाखल केली.
• पारीख याच्याकडे सुपूर्द केलेल्या कांद्याची परस्पर विल्हेवाट लावून अपहार करून जाधव यांची १२,०५,३४२ रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.