खमताणे : कसमादे पट्टयातील कांदा उत्पादक सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. हवामान बदलामुळे फवारणीचा खर्च वाढणार आहे. इतर पिकांवर देखील या हवामानाचा विपरित परिणाम होत आहे.
यंदा कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आज ना उद्या कांद्याचे पैसे होतील, या आशेने कांदा लागवड सुरू असताना निसर्गाचा लहरीपणा कांदा उत्पादकांच्या मुळावर आला आहे. सध्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लागवडीचा खर्च तसेच खते व औषधे यांचा खर्च मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यात भर म्हणजे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येताना दिसत आहे.
गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके जोमात आहेत. अनुकूल वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. वाढलेले धुके आणि ढगाळ हवामानामुळे पिकांना रोगांनी ग्रासले आहे.
महागडी औषध फवारणी
वटार : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी कांदा उत्पादक आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे भरपूर कांदा लागवड होत आहे. पण हवामान बदलामुळे कांदा रोपे ख़राब होत असून, महागड्या औषधांची फवारणी करून कांदा रोपे व कांदा पीक वाचवण्याच्या प्रयत्नात परिसरातील बळीराजा दिसत आहे. महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक वाचवण्याच्या प्रयत्नात परिसरातील बळीराजा दिसत आहे.
