कांद्याला किमान ३००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान तात्काळ जाहीर करावे, या प्रमुख मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास २३ फेब्रुवारी पासून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यासह चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाले असून बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याला किमान ३००० रुपये हमीभाव जाहीर करावा, यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, बाजार समित्यांमध्ये खरेदीची गती वाढवावी, कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत, हमीभावात खरेदीची मर्यादा वाढवून सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशा मागण्या आहेत.
निवेदनावर डॉ. सयाजीराव नारायणराव गायकवाड, डॉ. आत्माराम पोपटराव कुंभार्डे, संजय दगुजी जाधव, संपतराव भाऊसाहेब वक्टे, डॉ. शामराव माधवराव जाधव, भीमराव कोंडाजी जेजुरे, विजय पुंजाराम जाधव, समाधान कारभारी जामदार, अन्वर रमजाण पठाण, दशरथ संतू ठाकरे, नीलेश अर्जुन ढगे, शांताराम कोंडाजी गांगुर्डे, अनिल शहाजी भोकनळ, दत्तात्रय शंकरराव वाघचौरे, साहेबराव भावराव चव्हाण, साहेबराव पहाण, विजय मुरलीधर कुंभार्डे, रेवण ठाकरे, वाल्मीकराव वानखेडे, सुभाष जाधव आदींची नावे आहेत.
तहसीलदारांना निवेदन
शासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे. या निवेदनावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रत जिल्हाधिकारी तहसीलदार व पोलिस निरीक्षक, चांदवड पोलिस स्टेशन यांना देण्यात आली. यावेळी बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
