Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2023 13:09 IST

पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

सातारा जिल्ह्यात कांद्याचा किलोचा दर ५० रुपयांवर गेला असून शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. यामुळे येथून पुढे कांदा क्षेत्रात वाढ होणार का, असा प्रश्ना निर्माण झालेला आहे. पण, पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. सध्या बाजारपेठेत कांद्याला ४० ते ५० रुपये दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.

कांद्याच्या क्षेत्रात घट होणार?जिल्ह्यातील कमी पर्जन्यमान असणाऱ्याा तालुक्यात कांदा पीक अधिक प्रमाणात घेण्यात येते. पण, यावर्षी सर्वच तालुक्यात अत्यल्प पाऊस पडलेला आहे. आता कांदा लागण केलीतर पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे दर वाढला असला तरी शेतकरी पाण्याअभावी कांदा लागणीकडे अधिक प्रमाणात वळणार नाहीत, असा अंदाज आहे.

कांदा बी दरावर परिणाम नाही.कांद्याचे गरवा आणि हळवा असे दोन प्रकार आहेत. तसेच दोन्हींचे बियाणे वेगळे आहे. सध्या दोन हजार किलोप्रमाणे बियाणे मिळत आहेत. पाऊस चांगला असता तर बियाण्यांचा दर दुपटीने वाढला असता.

रोपवाटिका दूर; पाणी कुठून आणणार?- सातारा जिल्ह्यातील शेतकरी गरवा आणि हळवा असे दोन प्रकारचे कांदे घेतात. सध्या गरवा कांदा लागवड काही भागात सुरु झाली आहे.- या कांदा लागणीपूर्वी रोपवाटिका तयार करण्यात येते. यामधील रोपे बाजारात विक्रीस जातात. तसेच शेतकरी स्वतःच्या शेतातही लागण करतो.- पण, आता रोपवाटिका तयार केलीतर त्याला बाजारात ग्राहक मिळेल का याविषयी शंका आहे. दुष्काळी स्थितीमुळे मागणी कमी राहणार आहे.

शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण.जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात कांदा मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पण, यंदा कांदा घेण्यासारखी स्थिती नाही. बियाणे घेतले तर पाणी नसल्याने कांदा लागण कुठे करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. तसेच उपलब्ध पाण्यावर जनावरांसाठी चारा आणि काही धान्य पिके घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे कांदा क्षेत्र कमीच होणार आहे.

दरवर्षी दीड एकरापर्यंत कांदा घेतो. सध्या एक एकर आहे. पण, पाणी नसल्याने गरवा कांदा आता घेणार नाही. दोन वर्षे गरवा कांदा घेतला; पण दरच मिळाला नाही. त्यामुळे पदरमोड करावी लागली. यंदा तर पाऊस कमी असल्याने कांद्याचा विचार नाही. - विश्वासराव धुमाळ, शेतकरी आदर्की बुद्रुक, ता. फलटण

 

टॅग्स :कांदारब्बीशेतकरीपीकशेतीपाऊससाताराबाजारमार्केट यार्ड