नितीन गव्हाळे
सर्पदंशामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि तातडीच्या उपचारांना अचूक दिशा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्पदंश विषारी सापाचा आहे की नाही, हे काही मिनिटांत ओळख देणारे 'स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट' आता राज्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थांना उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असून आरोग्य विभागाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे या रॅपिड टेस्ट किटचा समावेश अधिकृतरीत्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा साहित्य यादीत करण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीमध्ये या किट्समुळे त्वरित निर्णय घेणे शक्य होणार असून सर्पदंश रुग्णांच्या उपचारात ही किट 'गोल्ड स्टैंडर्ड' ठरणार आहेत.
दरम्यान या आर्थिक वर्षासाठी १,१०,२१३ किट खरेदीला मंजुरी दिली आहे. प्रत्येक किटची किंमत रु. ५५७.५० असून, एकलस्त्रोत पद्धतीने खरेदी करण्यात येतात. या किटमुळे साप विषारी आहे की नाही हे त्वरित समजत असल्याने अनावश्यक ॲन्टी स्नेक वेनमचा वापर कमी होईल.
स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट म्हणजे काय?
• स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किट हे सर्पदंश झाल्यानंतर साप विषारी आहे की नाही, तसेच कोणत्या प्रकारचा साप विषारी आहे, याचे त्वरित निदान करणारे आधुनिक, जलद तपासणी साधन आहे. हे किट काही मिनिटांत निकाल देते आणि सर्पदंश उपचारात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
• रुग्णाच्या रक्तातील किंवा जखमस्थळी उपस्थित साप विषाचे कण शोधण्याची क्षमता या किटमध्ये असते. नमुना किटमध्ये टाकल्यानंतर ५ ते १० मिनिटांत विष उपस्थित आहे की नाही याची माहिती मिळते.
सर्पदंशाचे तत्काळ निदान
या किटमुळे सर्पदंश विषारी आहे की बिनविषारी आहे, याचे निदान होणार असून, त्यामुळे उपचारांची दिशा योग्य ठरवता येईल. याचा ग्रामीण, वनक्षेत्रांतील रुग्णांना मोठा फायदा होईल.
स्नेक वेनम रॅपिड टेस्ट किटची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने १६२० किट मंजूर केल्या आहे. या किटमुळे सर्पदंश विषारी आहे की, बिनविषारी आहे, हे कळणार आहे आणि अनावश्यक ॲन्टी स्नेक वेनमचा वापर टाळला जाईल. - डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.
हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर
