पुणे : नवीन आधार नोंदणी, तसेच दहा वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या आधार क्रमांकाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार यंत्रांचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व ३६ जिल्ह्यांसाठी २ हजार ९११ आधार यंत्र देण्याचे ठरविले आहे.
त्यात सर्वाधिक २०३ यंत्रे पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. येत्या आठवडाभरात ही यंत्रे मिळणार असून, राज्यासाठी आणखी सुमारे १ हजार २०० यंत्रांची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्यात २०१४ मध्ये एकूण ३ हजार ८७३ आधार यंत्रे देण्यात आली होती. मात्र, त्यातील २ हजार ५५८ यंत्रेच कार्यरत असून, उर्वरित १ हजार ३१५ यंत्रे नादुरुस्त असल्याने नवीन आधार, तसेच जुन्या आधार क्रमांकांचे अद्ययावतीकरण रखडले आहे.
त्यामुळे नवीन यंत्रे देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे केले जात होती. राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन नव्या ४ हजार १६६ यंत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात २ हजार ९११ यंत्रे सर्व ३६ जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत. येत्या आठवडाभरात ही यंत्रे संबंधित जिल्ह्यांमध्ये पोचतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ही यंत्रे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना एक कार्यपद्धती निश्चित करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा समन्वयक अधिकारी, जिल्हा प्रकल्प प्रबंधक आणि जिल्हा आयटी समन्वय यांना काम सोपविण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित केल्यानंतर ही यंत्रे देण्यासाठी एका परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्तीर्ण प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे यंत्रे सोपविली जाणार आहे.
त्यानंतरच या यंत्रांच्या माध्यमातून नवीन आधार, तसेच आधार अद्यवतीकरण होणार आहे. तोपर्यंत जुन्या यंत्रांवरच कामकाज करावे लागणार आहे, असे सूत्रानी सांगितले.
कोणत्या जिल्ह्यात किती आधार यंत्र दिली जाणार?
अहिल्यानगर - ७७
अकोला - ७५
अमरावती - १०४
संभाजीनगर - ७५
बीड - ७७
भंडारा - ३१
बुलढाणा - ७९
चंद्रपूर - ८१
धुळे - ४४
गडचिरोली - ४०
गोंदिया - ४१
हिंगोली - ६०
जळगाव - ११३
जालना - ६०
कोल्हापूर - ८३
लातूर - ५९
मुंबई शहर - ६४
मुंबई उपनगर - १३२
नागपूर - ६०
नांदेड - १२५
नंदूरबार - ४९
नाशिक - १२१
धाराशिव - ६८
पालघर - ८६
परभणी - ७१
पुणे - २०३
रायगड - ७१
रत्नागिरी - ५३
सांगली - ७५
सातारा - ७९
सिंधुदुर्ग - ३८
सोलापूर - १३१
ठाणे - १८४
वर्धा - ३०
वाशिम - ५५
यवतमाळ - ११७
एकूण - २,९११
अधिक वाचा: Dasta Nondani : राज्यात दस्त नोंदणी कार्यालयांची वाढविली वेळ; किती वाजेपर्यंत सुरु राहणार नोंदणी?