खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उडीद आणि मूग पिकांची काढणी पूर्ण झाली आहे, तर सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी रब्बी पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी खतांचे नियोजन सुरू केले आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात एकूण २ लाख १७ हजार मेट्रीक टन खतांची गरज भासणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध होणार आहे, कारण सध्या खरीप हंगामातील जवळपास ९० हजार मेट्रीक टनपेक्षा अधिकचा साठा शिल्लक आहे.
जळगाव जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभम्हस्के यांनी सांगितले की, यंदा जिल्ह्यात सुमारे ३ लाख हेक्टरपर्यंत रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खतांची टंचाई निर्माण होणार नाही, असा दावा कृषी विभाग करत आहे.
महिनानिहाय असे केले जाईल यंदा खतांचे वाटप
महिना | युरिया | डीएपी | एमओपी | एनपीके | एसएसपी (मेट्रिक टनमध्ये) |
ऑक्टोबर | ८३४० | ११९० | ३९५२ | १०५७० | ४६९० |
नोव्हेंबर | ९७३० | १८७० | ४५६० | १३५९० | ४३५५ |
डिसेंबर | १७३७५ | २१२५ | ६६८८ | १८१२० | ७७०५ |
जानेवारी | १४५९५ | १३६० | ६०८० | १८१२० | ७०३५ |
फेब्रुवारी | १०४२५ | ९३५ | ४८६४ | ९८१५ | ५०२५ |
मार्च | ९०३५ | १०२० | ४२५६ | ८३०५ | ४६९० |
टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक
• दरवर्षी कृषी विभाग खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा करत असला तरी, ऐन हंगामात अनेकदा खतांची टंचाई निर्माण होते. ही टंचाई अनेकदा खत विक्रेत्यांकडून कृत्रिमरित्या निर्माण केली जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
• त्यामुळे, कृषी विभागाने साठवणूक करून टंचाई निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर लक्ष केंद्रित केल्यास, यंदा शेतकऱ्यांना खतांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागणार नाही.