मल्लिकार्जुन देशमुखे
ग्रामीण भागात सुशिक्षित मुलींचा 'शेती नको, नोकरीवाला मुलगाच हवा' हा वाढता कल आता थेट शेतकरी तरुणांच्या भविष्यावर परिणाम करू लागला आहे. मुलींची घटलेली संख्या, वाढलेली सुशिक्षितता आणि विवाहात स्थिर नोकरीची सक्तीची अट यामुळे तिशी-पस्तीशीच्या वयोगटातील अनेक तरुण आजही अविवाहित आहेत.
परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की केवळ लग्नासाठी अनेकांना आपली शेती सोडून कमी पगारात शहरातील कंपन्यांत नोकरी स्वीकारावी लागत आहे. यावर ज्येष्ठांचे मत मात्र स्पष्ट आहे की, 'शेती हा गुन्हा नाही; हा दृष्टिकोन बदलणे काळाची गरज आहे.' परंतु वास्तव मात्र अत्यंत दाहक आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी तुळसी विवाह पर्वानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असला तरी मुला-मुलींच्या प्रमाणातील तफावत शेतकरी व बेरोजगार तरुणांसमोर मोठी अडचण बनली आहे. मुलींची संख्या घटलेली, मुलांचे प्रमाण जास्त यामुळे वधू मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे.
त्यातच सुशिक्षित, स्वावलंबी मुलींची वाढती संख्या संपूर्ण समीकरण बदलून टाकणारी ठरत आहे. संगणक, शिलाईकाम, ब्युटीपार्लर, बी.एड, डी.एड, इंजिनिअरिंग, डॉक्टर, वकील, पोलिस अशा व्यावसायिक शिक्षणामुळे मुली चांगल्या पदांवर नोकऱ्या मिळवत आहेत. त्यामुळे त्यांचे विवाहाविषयीचे निकषही उंचावले आहेत.
दरम्यान हुंडा जवळपास संपला; तर आजची सर्वात मोठी अट एकच 'मुलगी मिळावी; पण नोकरीवाला मुलगाच हवा.' यात वयाची ३५ ओलांडलेल्या तरुणांमध्ये मुली मिळत नसल्याने न्यूनगंड निर्माण होत आहे. शिवाय मुली उपवर झाल्या तरी त्यांना स्थिरस्थावर असलेलाच मुलगा नवरा म्हणून हवा आहे. या दोन्हींच्या कात्रीत तरुणाई अडकली असून, अविवाहित राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
'नोकरीत स्थिर उत्पन्नाची खात्री', विवाहातील प्रमुख निकष
मुलगा चांगल्या नोकरीवर असावा, मोठ्या शहरात असावा... या अटींमुळे लाखो-कोट्यवधीची शेती असूनही अनेक शेतकरी तरुणांना नकार मिळतो. परिणामी अनेकांना शहरांकडे धाव घ्यावी लागून कमी पगारात नोकरी स्वीकारावी लागत आहे. स्थिर उत्पन्नाची खात्री हा विवाहातील प्रमुख निकष ठरला आहे.
शेती हा गुन्हा नाही; हा दृष्टिकोन बदलणे काळाची गरज आहे. आज सुशिक्षित मुली 'नोकरीवाला मुलगाच हवा' या अटीवर ठाम राहतात आणि शेतकरी मुलांना उघड नकार मिळतो. जमीन असूनही केवळ शेती करतो म्हणून स्थळ मिळत नाही. परिणामी अनेकांना लग्नासाठी शहरात कमी पगारात नोकरी घ्यावी लागते. - संजय पाटील खवेकर, वधू-वर सूचक मंडळ, मंगळवेढा जि. सोलापूर.
