केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे.
राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण’ झाले.
या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे.
या योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६ हजार रुपये वितरीत करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते.
आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे ९ हजार आणि केंद्रशासनाचे ६ हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.