मशरूमच्या (Mushrooms) सेवनामुळे शरीराला विविध लाभ होतात. त्याचा पौष्टिकतेचा विचार केला तर तो फक्त चवीला चवदारच नाही, तर शरीरासाठीदेखील अत्यंत फायदेशीर आहे. आजच्या जीवनशैलीत जेव्हा मांसाहारी आणि तैलीय पदार्थ खाण्याची वाढती प्रवृत्ती आहे, तेव्हा ऑयस्टर मशरूमला (oyster mushrooms) शाकाहारी आणि पौष्टिक पर्याय म्हणून समाविष्ट करणे योग्य ठरते. मशरूमचा समावेश आपल्या आहारात केल्यास त्याचे विविध फायदे शरीरास चांगले परिणाम देतात.
मशरूम हे विशेष प्रकारच्या बुरशीचे फळ आहे, जे फुटू, छत्री, भिभौरा, चेस्ट, मशरूम, धिगरी आदी नावांनी ओळखले जाते. त्याच्या पौष्टिक गुणधर्मामुळे ते आधुनिक युगातील एक महत्त्वपूर्ण अन्नआहार मानले जाते.
मशरूमला जगभर एक 'पौष्टिक अन्न' म्हणून मान्यता मिळालेली आहे. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि सुस्थितीत राहण्यासाठी १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूममध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत.
जगप्रसिद्ध असणारे मशरूम हे एक उत्तम सुपरफूड आहे. ऑयस्टर मशरूमला मराठीमध्ये 'धिंगारी अळंबी' असे म्हणतात.
ऑयस्टर मशरूममध्ये कोणत्याही मांसाहारी पदार्थांपेक्षा जास्त प्रथिने असतात. यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आणि जीवनसत्त्वेदेखील असतात, जी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. मशरूम हा बुरशीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये क्लोरोफिल नसतो.
खाण्यायोग्य मशरूम अतिशय स्वच्छ आणि पौष्टिक वातावरणात वाढतात.
ऑयस्टर मशरूमचा रंग आणि आकार ऑयस्टरसारखा असतो. त्याची चव खूप चवदार असते. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
मशरूम व्हेज आहे की नॉनव्हेज ?
मशरूम व्हेज असते की नॉनव्हेज ? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. मशरूमला इतर झाडांप्रमाणे पानं, मुळं किंवा बिया नसतात आणि याला वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाचीदेखील गरज पडत नाही. त्यामुळे अनेकजण याला व्हेज किंवा व्हेजिटेबल मानत नाहीत. तसेच मशरूम हे प्राणी किंवा नॉनव्हेज प्रमाणे दिसत नाही आणि यात मांसही नसते. म्हणून याला नॉनव्हेजदेखील म्हणता येत नाही.
ऑयस्टर मशरूम हे शाकाहारी आहारात समाविष्ट केले जाते, कारण ते प्राण्यांपासून बनलेले नाही. मशरूमचे विविध प्रकार वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरले जातात.
मशरूम पुलाव, मशरूम पकोडे, पिझ्झा टॉपिंग, सँडविच, मशरूम सूप, मशरूम ग्रील, मशरूमची करी, मशरूम मॅग्गी, मशरूम कटलेट, मशरूम मसाला असे अनेक पदार्थ आपण मशरूमपासून बनवून खाऊ शकतो.
ऑयस्टर मशरूम खाण्याचे फायदे
* प्रोस्टेट आणि स्तनाचा कॅन्सर रोखते : बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग झपाट्याने वाढत आहे. मशरूममध्ये असलेले लिनोलिक अॅसिड आणि बीटा ग्लुकन्स अँटिकार्सिनोजेनिक असतात. हे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.
* रक्तदाब कमी करते: ऑयस्टर मशरूममध्ये काही घटक असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित आणि स्थिर ठेवण्यास मदत करतात. इन्सुलिनसाठी शरीराची संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते.
* हाडे मजबूत करते: मशरूम व्हिटॅमिन डीचा एक समृद्ध स्रोत आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फरस पुरवतो, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
* प्रतिकारशक्ती वाढवते : मशरूमचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती अनेक पटींनी वाढते. मशरूममध्ये असलेले बीटा ग्लुकन्स शरीराला सर्दी आणि इतर व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
* अशक्तपणावर उपचार करते : मशरूममध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असते. लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये थकवा, डोकेदुखी आदी समस्या होतात, परंतु मशरूम लोह पुरवठा करते.
* कोलेस्ट्रॉलची पातळी : कमी करण्यास मदत ऑयस्टर मशरूममध्ये बीटा ग्लुकन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी केली जाते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
* दात, नखे आणि केसांना मजबुती देते: मशरूममध्ये असलेला सेलेनियम हा घटक आपल्या दातांसाठी, नखांसाठी, केसांसाठी आणि हाडांसाठी खूप महत्त्वाचा असतो. सेलेनियम मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतो.
* वजन कमी करण्यासाठी प्रभावी : मशरूमचे सेवन वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते. रेड मीट आणि व्हाईट मीटच्या तुलनेत, मशरूम अधिक हलके प्रोटीन पुरवतो, जो वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.
* मन निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी : मशरूममध्ये कॉपर आणि नियासिन असतात, जे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. यामुळे मानसिक स्वास्थ्य कायम राखता येते.
- डॉ. एस.डी. वानखडे (पीएच. डी., उदयनविद्या, डॉ. पंदेकृवी, अकोला)
हे ही वाचा सविस्तर :