राहुरी: मधुमक्षिकापालनाचे शेतीसह मानवी जीवनास असंख्य फायदे आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत ६०० शिक्षणार्थीनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
त्यापैकी अंदाजे २५ ते ३० प्रशिक्षणार्थी मधुमक्षिकापालन करत आहेत. मधुमक्षिकापालन करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जात आहे.
शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढविण्यासाठी एक एकरसाठी किमान मधुमक्षिकापालनाची एक पेटी बसविण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संदीप लांडगे व रणजित कडू यांनी केले आहे.
मधमाशांचा इतिहास हा मानववंशाच्या इतिहासापेक्षा फार पुरातन आहे. मानवाचा उदय होण्यापूर्वी अनेक कोटी वर्षे मधमाशा आणि तत्सम कीटक वास्तव्यास होते.
मधमाशी निसर्गातील अतिशय महत्त्वाचा अविभाज्य घटक असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मधमाशी जगाचे संतुलन राखण्याचे व संवर्धनाचे अविरत कार्य करत असते.
थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन मधमाशांचे महत्त्व जगाला पटवून देताना सांगतात की, जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर त्यानंतर अवघ्या चार वर्षात मानवाचे अस्तित्वसुद्धा संपुष्टात येईल, कारण या पृथ्वीतलावरून मधमाशा लुप्त झाल्या तर वनस्पतींचे प्रभावी परागीभवन होणार नाही.
पिकांचे परागीभवन झाले नाही तर पिके व अन्ननिर्मितीमध्ये टंचाई निर्माण होऊन प्राणी व मानवाला अन्न उपलब्ध होणार नाही आणि कालांतराने सजीवसृष्टी संपुष्टात येईल.
मोहळ काढताना काय काळजी घ्यावी?
मोहळ काढताना शक्यतो डोक्याला बी व्हेल (जाळीची गोल टोपी) घालावी. हातात हातमोजे घालाये तसेच संपूर्ण अंग झाकून घ्यावे आणि हळुवारपणे मधाचे पोळे काढावे.
पिकाला शेकडा असा होतो फायदा
कांदा ७७ टक्के, डाळिंब ६८ टक्के, नारळ ८०, करडई ६४, तर शेवगा ३० टक्के, वेलवर्गीय भाजीपाला २० टक्के, कापूस १८ टक्के इतके उत्पादन वाढत असून, शेतकऱ्यांनी किमान एक पेटी एक एकर क्षेत्रामध्ये बसविण्याचे अवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे
मधाचे उपयोग
१) मध हे निसर्गात सर्वांत पौष्टिक अन्न मानले जाते. कारण मधामध्ये मानवी शरीराला आवश्यक असे सर्व पौष्टिक घटक असतात.
२) मधामध्ये आढळणारे प्रमुख घटक म्हणजे प्रथिने, अमिनो आम्ल, व्हिटॅमिन डी कॉम्प्लेक्स, फॉलिक आम्ल होय.
३) मध हा शीतल, मधुर, नेत्रास हितकारक, स्वरसुधारणा, बुद्धीची धारणता वाढविण्यासाठी मदत करणारा तसेच खोकला, पित्ताशय दूर करणारा पदार्थ आहे.
४) मधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्त्ती वाढते, भूक वाढते, मधामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो व शरीरातील रक्त शुद्ध होते.
५) पोटदुखी, मळमळ होत असल्यास लिंबाच्या रसात मध मिसळून खाल्ल्यास त्रास कमी होतो, केसाच्या वाढीसाठी व त्वचा तजेलदार होण्यासाठी मध अत्यंत उपयोगी ठरते.
६) उघड्या जखमेवर मध लावल्यास जखम जलद भरून येते. मध हे एक ऊर्जास्रोत म्हणून वापरले जाते.
७) मध हा कर्करोग, हृदयरोग, मधुमेह प्रतिबंध तसेच चिंताग्रस्तपणासाठी आरामदायक तसेच शक्तिवर्धक आहे.
५० टक्क्यांपर्यंत अनुदान
मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण पुणे व महाबळेश्वर येथे सध्या सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कीटकशास्त्र विभागाने दिली आहे.
मधमाशीचे पोळे काढताना जाळू किंवा धूर करू नये. यामध्ये माशा मरतात. आपणास कोणाला मोहळ अडचणीचे ठरू लागल्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कृषी कीटकशास्त्र विभाग यांच्याशी संपर्क साधावा. - संदीप लांडगे/रणजित कडू, सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग