पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल ९२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
यामुळे ५१२ कोटी ३२ लाख रुपयांचे आर्थिक ओझे शेतकऱ्यांच्या डोक्यावरून हलके होणार आहे. यासोबतच नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभही लवकरच मिळणार असून त्यादृष्टीने ही यादी भरण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँकांकडील कर्जातून मुक्ती मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी' योजनेंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणीसाठी सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल मागविला होता.
त्यानुसार राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंअंतर्गत जिल्ह्यात सहकार विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण केले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार ९२ हजार ६०९ शेतकऱ्यांचे ५१२ कोटींचे कर्ज माफ होणार आहे.
प्रोत्साहन लाभही मिळणार
• नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही दखल प्रशासनाने घेतली आहे.
• जळगाव जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार २४६ शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली आहे.
• या नियमित कर्जदारांची माहिती देखील पूर्णपणे भरण्यात आली आहे.
• त्यामुळे त्यांनाही शासनाकडून प्रोत्साहन लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आधार प्रमाणीकरण आवश्यक
• राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनें'तर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे, मात्र दोन्ही लाभांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
• शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक असून आधार पडताळणी नंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.
• त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करायची असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
माहिती पोर्टलवर अपलोड
• गेल्या सप्टेंबरदरम्यान थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनें'तर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून जिल्ह्यातील पीककर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर केली आहे.
• यात सर्वात जास्त जिल्हा बँकेचे थकीत पीक कर्जदारांची यादी असून थकीत सभासदांची माहिती पोर्टलवर भरण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
शासनाच्या सूचनेनुसार माहिती शासनाच्या पोर्टलवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून भरण्यात आलेली आहे. पात्र थकबाकीदार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये, हा उद्देश आहे. - गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.
