नाशिक जिल्ह्याच्या आमोदे (ता. नांदगाव) येथे तालुका कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन व कडधान्य अभियान या केंद्र सरकारच्या योजनांचा शुभारंभ ऑनलाईन थेट प्रक्षेपणाद्वारे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन जैविक निविष्ठा संसाधन केंद्र आमोदे येथे राजेश पाटील यांच्या शेतावर करण्यात आले होते. यानिमित्ताने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या "श्रीराम नैसर्गिक शेतकरी गट आमोदे" या गटातील शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने झाली. यानंतर तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यांनी आपल्या भाषणात शेती क्षेत्रासमोरील विविध आव्हानांचा आढावा घेतला. बदलते हवामान, घटती उत्पादकता, मर्यादित सिंचन क्षमता, अपुरी कर्जसुविधा, साठवणूक व प्रक्रिया सुविधांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी भाष्य केले.
या सर्व अडचणींवर मात करून शाश्वत शेतीपद्धतीचा विकास, जमिनीची सुपीकता वाढवणे, मिश्र पीक पद्धतीचा अवलंब, उत्पादन खर्चात कपात व उत्पन्नात वाढ हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर मंडळ कृषी अधिकारी प्रताप हाके यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन सुसुत्र पद्धतीने करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण सत्रात नितिन वारके (सर्ग विकास समिती, अकोला) यांनी नैसर्गिक निविष्ठांच्या वापराबाबत सखोल माहिती दिली. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या पिकांची लागवड करून त्यांना फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडणे, गांडूळ खत, कंपोस्ट खत, जीवामृत यांचा वापर, तसेच पिकांच्या संरक्षणासाठी निमास्त्र, अग्निस्त्र, दशपर्णी अर्क, जैविक सापळे, आंतरपिकांची लागवड यासारख्या नैसर्गिक उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
तसेच युवा मित्रा संस्था सिन्नरचे विभाग प्रमुख बाळासाहेब जाधव यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे मानवी आरोग्यावरचे दुष्परिणाम व पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मांडणी केली. सेंद्रिय निविष्ठांच्या वापरामुळे विषमुक्त भाजीपाला उत्पादन शक्य असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
या कार्यक्रमात जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे प्रमुख राजेश पाटील यांनी ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, अझोटोबॅक्टर, वेस्ट डिकंपोझर, गोकृपामृत यांसारख्या निविष्ठांचे उत्पादन व वापर कसा करावा यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एस. टी. कर्नर यांनी केले. या कार्यक्रमाला आमोदे गावातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब पगार, दादा पगार, सरपंच विठ्ठल पगार तसेच शेतकरी गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर सर्व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि सेवक भक्ती भवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.