अहिल्यानगर जिल्ह्याच्या अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने ले-ऑफ जाहीर केल्याने सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने कामगार युनियनशी करार करून शुक्रवार (दि. १७ एप्रिल) कामगारांना ले-ऑफ जाहीर केले.
या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि कामगारांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी केला आहे.
शेडगे यांनी पुढे म्हटले आहे की, अशोक कारखाना व्यवस्थापनाने कामगार युनियनशी करार करून शुक्रवार (दि. १७ एप्रिल) कामगारांना ले-ऑफ जाहीर केला.
या निर्णयावर कारखान्याचे हितचिंतक सभासद आणि कामगार संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. "कारखाना मुरकुटे यांनी चालविला आणि टिकविला" अशी शाबासकीची थाप पूर्वी ज्येष्ठ सभासद देत होते.
मात्र आता मुरकुटे यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कारखान्यातून स्वतःची प्रॉपर्टी वाढवली असून, सभासद आणि कामगारांचा विश्वासघात केला असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अशोक कारखान्याचे चेअरमन सी.ए. असताना अशी परिस्थिती येणे दुर्दैवी आहे, असेही शेडगे म्हणाले.
दरम्यान अशोकरुपी कामधेनुची एकूणच आर्थिक स्थिती नाजूक असल्याचा इशारा यामधून मिळतो. तसेच, कामगारांचे सहा ते दहा महिन्यांचे पगार थकलेले आहेत, तर निवृत्त कामगारांची ग्रॅच्युएटीही थकलेली आहे.
कामगारांच्या नावावर बँकेकडून कर्ज घेतले गेले असून त्यांना कर्जबाजारी केले गेले असल्याचेही बोलले जाते. तसेच याबाबत शेतकरी संघटना आणि सभासद कामगारांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा नीलेश शेडगे यांनी पत्रकात दिला आहे.
