PM Kisan Yojana : देशभरात केंद्र सरकार कडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येते.
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत २२ हफ्ते वितरित करण्यात आले आहेत. प्रत्येक हफ्ता वितरणावेळी काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले जाते. कारण अटी व नियमामुळे अनेक शेतकऱ्यांना आजही फटका बसत आहे. यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या नावावरती शेतजमीन कधी झाली आहे आणि कोणत्या कारणांमुळे झाली आहे, हे देखील महत्वाचे आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना मध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थी शेतकरी यांच्या नावावर ०१ फेब्रुवारी २०१९ च्या अगोदर पासून शेतजमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे शेत जमिनीचा फेरफार हा ०१ फेब्रुवारी २०१९ च्या अगोदरचा असणे आवश्यक आहे. ०१ फेब्रुवारी २०१९ च्या नंतर आपण जमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेमध्ये अपात्र ठरविले जातात.
अपवाद, ०१ फेब्रुवारी २०१९ च्या नंतर आपल्या नावावर जमीन झाली असेल आणि ही जमीन आपल्याला वारस हक्काने मिळाली असेल आणि त्याची नोंद आपल्या फेरफार मध्ये "वारस हक्काने" अशी झाली असेल तर मात्र आपण या योजने मध्ये पात्र ठरू शकता, असे या योजनेतून सांगण्यात आले आहे.
