जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला असून, तापमानाचा पारा ४१ अंशांवर गेला आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिक उन्हापासून बचावासाठी विविध उपाय करत आहेत. यामध्ये ग्रामीण व निमशहरी भागात आजही अनेक जण 'खिशात कांदा ठेवल्यास ऊन लागत नाही' या पारंपारिक समजुतीवर विश्वास ठेवतात.
उन्हात फिरताना सोबत किंवा खिशात कांदा ठेवला तर तो शरीरातील उष्णता शोषून घेतो आणि उष्माघाताचा त्रास होत नाही असे मानून आजही अनेक जण खिशात कांदा बाळगताना दिसतात. परंतु, कांदा खाणे आरोग्यदायी असू शकते, मात्र, तो सोबत बाळगल्याने उन्हाचा त्रास कमी होत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
कांदा 'खिशात' नको, 'पोटात' हवा!
कांदा फायद्याचा : उन्हाळ्यात कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत, जे उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतात, त्यामुळे कांदा केवळ खिशात नको, तर पोटात हवा.
शरीराचे तापमान नियंत्रण : कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते.
क्वेरसेटिन : कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे घटक असते, जे शरीराला उष्णतेविरुद्ध लढण्याची शक्ती देते आणि जळजळ कमी करते.
पचनशक्ती : उन्हाळ्यात पचनक्रिया मंदावते, अशा वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने पचन सुधारते.
कांद्याचा रस : जर एखाद्याला उन्हाचा तीव्र झटका बसला असेल आणि ताप चढला असेल, तर कांद्याचा रस उष्णता शोषून घेण्यास मदत करतो.
उन्हापासून बचावासाठी 'हे' उपाय करा
भरपूर पाणी प्या : तहान नसली तरी दर अर्ध्या तासाने पाणी प्या. लिंबू सरबत, ताक किंवा नारळ पाण्याचा आहारात समावेश करा.
पोशाखाची काळजी : बाहेर पडताना पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरा. डोक्याला रुमाल, टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
वेळेचे नियोजन : दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.
आहार : उन्हाळ्यात पचायला हलके अन्न खा आणि आहारात कांदा, काकडी, टरबूज यासारख्या जलशोषक पदार्थांचा खाण्यासाठी वापर करा.
उन्हात फिरताना खिशात कांदा ठेवल्याने ऊन लागत नाही ही केवळ लोकधारणा आहे. वैज्ञानिकदृष्ट्या याचा कोणताही उपयोग उष्माघात रोखण्यासाठी होत नाही. अशा समजुतींच्या आहारी जाऊन नागरिक खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. उन्हापासून वाचण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवावे.
- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
