Sugarcane Crushing Season : राज्यभरात १ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना ऊसतोडणी व गळीत हंगामाची परवानगी मिळाली असली तरी, प्रत्यक्षात शेतातील परिस्थिती गंभीर आहे. (Sugarcane Crushing Season)
वडीगोद्री परिसरात सुरू झालेल्या साखर गळीत हंगामावर अवकाळी पावसाचे सावट पसरले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे उसाच्या फडात पाणी साचले असून वापसा (जमिनीचा ओलावा कमी होणे) न झाल्याने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. (Sugarcane Crushing Season)
गळीत हंगामावर अवकाळीचा घाला
राज्य सरकारने यंदाच्या हंगामासाठी सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना १ नोव्हेंबरपासून गळीत सुरू करण्याची परवानगी दिली. अनेक कारखान्यांनी पारंपरिक पद्धतीने गळीत शुभारंभ केला असला तरी, हवामानाने खेळखंडोबा केला आहे.
शेतात पाणी साचल्याने फडात पाय ठेवणेही कठीण झाले आहे.
तोडणी टोळ्या तयार असूनही, ऊसतोडणी सुरू होऊ शकलेली नाही.
रस्त्यालगतच्या काही भागात मर्यादित तोडणी सुरू आहे, पण आतील पट्ट्यांतील ऊस फड पूर्णपणे थांबले आहेत.
कामगारांची तारांबळ आणि उपजीविकेची संकटे
अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचेही हाल झाले आहेत. फडात काम सुरू नसल्याने कामगारांनी रस्त्यालगत झोपड्या उभारल्या आहेत.
चिखल आणि ओलाव्यामुळे झोपण्यास मोठी अडचण.
अनेक ठिकाणी जमिनीत अजूनही पाणी आणि चिखल आहे.
महिलांना स्वयंपाकाच्या वेळी धुरकट आणि ओली परिस्थितीचा त्रास.
कारखान्यांकडून काही कामगारांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले असून, त्याद्वारे पावसापासून तात्पुरते संरक्षण मिळत आहे. मात्र, परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत.
वाहतुकीतही अडचणी
शेतात पाणी साचल्याने ऊस वाहतुकीतही मोठा अडथळा येत आहे.
बैलगाड्या व ट्रॅक्टर शेतात नेणे शक्य नाही.
ऊसतोड कामगारांना डोक्यावर ऊस उचलून मुख्य रस्त्यावर आणावा लागत आहे.
यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाढले आहेत, पण उत्पन्न कमी झाले आहे.
साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता
गळीत हंगामाच्या सुरुवातीसच अडथळे आल्याने साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ऊसाच्या वाहतुकीत होणारा उशीर, ओलसर ऊस, आणि तोडणीतील अडथळे याचा थेट परिणाम कारखान्यांच्या गळीत क्षमतेवर होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार दोघेही चिंतेत आहेत.
वापसा झाल्याशिवाय तोडणी अशक्य
शेतातील पाणी ओसरले तरी जमिनीतील ओलावा (वापसा) कमी न झाल्याने फडात प्रवेश करणे अजूनही शक्य नाही. वापसा झाल्यावरच ऊसतोडणी सुरू करता येणार आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि कारखानदार तिघेही हवामान स्थिर होण्याची वाट पाहत आहेत.
परिस्थिती सुधारली तरच गती मिळणार
हवामान खात्याने पुढील काही दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पाऊस थांबून उन्हाळा पडल्यासच वापसा होईल आणि तोडणी पुन्हा सुरू होऊ शकेल. तोपर्यंत गळीत हंगामातील तयारी थांबलेलीच राहणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Crushing Season : बॉयलर पेटले... ऊस शेतकरी सज्ज! यंदा गळीत हंगाम लवकर
