Sugar factory Scheme : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकारी साखर कारखानदारीचे हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढविणे आणि कारखान्यांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन पर योजना राबविण्यात येते आहे.
यामध्ये स्पर्धात्मक गुणवत्ता असणाऱ्या ५००० मेट्रिक टन प्रतिदिन (टीसीडी) पेक्षा कमी गाळप क्षमता व ५ हजार मेट्रिक टन प्रतिदिन (टीसीडी) पेक्षा जास्त गाळप क्षमता अशा वर्गवारीनुसार कारखान्यांची निवड करून त्यांना सन्मानित करणे व प्रोत्साहित करणे या योजनेअंतर्गत खालील नऊ क्षेत्रांमध्ये एकत्रित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना दरवर्षी पारितोषिके दिली जातील.
| 1 | वेळेवर १००% FRP (रास्त आणि किफायतशीर किंमत) पेमेंट मागील ३ वर्षात | शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या, वेळेवर आणि पूर्ण FRP पेमेंट करणारा कारखाना. | गुण - १५ |
| 2 | इतर विभाग | कारखान्यामधील कार्यरत इतर विभाग (प्रत्येक विभागावार २ गुण) | गुण-१० |
| 3 | सर्वाधिक साखर उतारा (रिकव्हरी) | हे ज्यांच्या उत्कृष्ट तांत्रिक आणि परिचालन कार्यक्षमतेचे द्योतक आहे. | गुण - १० |
| 4 | प्रति हेक्टरी ऊस उत्पादन | आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसोबत काम करून प्रति हेक्टरी ऊस उत्पादन वाढवण्यात यशस्वी झालेला कारखाना. | गुण - १० |
| 5 | कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि सर्वाधिक क्षेत्र कव्हरेज | पीक आरोग्य निरीक्षण, उत्पन्नाचा अंदाज आणि संसाधन व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या आणि सर्वाधिक क्षेत्र कव्हरेज मिळवणाऱ्या कारखान्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवलंबल्याबद्दल. | गुण - १० |
| 6 | कमी कार्बन उत्सर्जन आणि उच्च कार्बन क्रेडिट्स | कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या आणि शाश्वत पद्धतींद्वारे सर्वाधिक कार्बन क्रेडिट्स मिळविणारा कारखाना. | गुण - १० |
| 7 | शासकीय कर्जाची वेळेवर परतफेड | कर्ज परतफेडीच्या वेळापत्रकाचे पालन करून मजबूत आर्थिक शिस्त दर्शवणारा कारखाना. | गुण - १० |
| 8 | खर्च, लेखापरीक्षण, दोष दुरुस्ती अहवाल आणि एकूण कार्यक्षमता | स्वतंत्र खर्च, लेखापरीक्षणानुसार, उच्च परिचालन कार्यक्षमता आणि अचूक आर्थिक व्यवस्थापन दर्शवणारा कारखाना. | गुण - ५ |
| 9 | कर्मचारी संख्या मर्यादा व वेतन अदायीकरण | गुण-५ |
समिती रचना : प्रोत्साहनपात्र कारखान्यांच्या निवडीसाठी या योजनेतंर्गत योग्य आणि तज्ज्ञ आधारित मुल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी दोन स्तरीय समितीद्वारे छाननी केली जाईल. अर्जाचे पुनरावलोकन व पारितोषिक विजेत्यांची निवड करावयाच्या छाननी समिती व निवड समितीची रचना खालीलप्रमाणे -
| 1 | साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे | अध्यक्ष |
| 2 | सचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय पुणे | सदस्य |
| 3 | संचालक (अर्थ), साखर आयुक्तालय पुणे | सदस्य |
| 4 | वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे यांचेकडील एक प्रतिनिधी | सदस्य |
| 5 | महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ (साखर संघ) यांचेकडील एक प्रतिनिधी | सदस्य |
| 6 | अर्थव्यवस्था, अभियांत्रिकी किंवा कृषी क्षेत्रातील साखर उद्योगातील दोन स्वतंत्र तज्ञ | सदस्य |
| 7 | सहसंचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय पुणे | सदस्य सचिव |
प्रादेशिक सहसंचालक त्यांच्या विभागातील उत्कृष्ट असे ५००० मेट्रिक टन प्रतिदिन (टीसीडी) पेक्षा कमी गाळप क्षमता असलेल्या व ५००० मेट्रिक टन प्रतिदिन (टीसीडी) पेक्षा जास्त गाळप क्षमता असलेले प्रत्येकी ३ सहकारी कारखाने व ३ खाजगी कारखान्यांची यादी छाननी समितीस सादर करतील, छाननी समिती प्राप्त झालेल्या प्रस्तांवामधून उत्कृष्ट १२ सहकारी व १२ खाजगी साखर करखान्यांची यादी निवड समितीकडे सादर करेल.
त्यांनतर छाननी समितीने पाठविलेले १२ उत्कृष्ट सहकारी कारखाने व १२ उत्कृष्ट खाजगी कारखान्यांच्या यादीमधून निवड समिती सर्वोत्कृष्ट ६ सहकारी व ६ खाजगी साखर कारखान्यांची पारितोषिक विजेते म्हणून निवड करतील. पारितोषिकाचे स्वरूप आणि इतर तपशील यथावकाश घोषित करण्यात येईल.
