नाशिक : 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' अंतर्गत निफाड तालुक्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून, सोनेवाडी खुर्द हे गाव तालुक्यातील पहिले 'ऑनलाइन रेशनकार्ड गाव' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
दुर्गामाता महिला बचत गट येथील रास्तभाव दुकानाचा परवानाधारक असून, गावातील पात्र लाभार्थ्यांची माहिती डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. शिधापत्रिकांची ऑनलाइन नोंदणी, आधार संलग्नता, धान्य वितरणाची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली आहे.
गावात एकूण १११ शिधापत्रिकाधारक असून, त्यामध्ये एकूण ४५ सदस्य असलेल्या १२ अंत्योदय योजना शिधापत्रिका, ३७८ अन्न सदस्य संख्या असलेल्या प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका यांचा समावेश आहे. गावात एकूण लाभार्थी सदस्य संख्या ४२३ आहे.
स्मार्ट रेशनकार्डच्या दिशेने पहिले पाऊल
डिजिटल युगात ई-शिधापत्रिक हे स्मार्ट रेशनकार्डच्या दिशेने पहिले पाऊल ठरत आहे. या प्रणालीमुळे व्यवहारात पारदर्शकता वाढली असून, धान्य वितरणाची नोंद रिअल टाइम पद्धतीने होत असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. माहिती अद्ययावत करणे, नाव दुरुस्ती, सदस्य वाढवणे किंवा कमी करणे ही कामेही ऑनलाइन पद्धतीने सुलभ झाली आहेत.
डिजिटल प्रणालीमुळे पारदर्शकता वाढते. नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होतो. सोनेवाडी खुर्दने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही या पद्धतीचा अवलंब करावा, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, निफाड
महसूल समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून विविध सेवा गावपातळीवर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोनेवाडी गावातील जीर्ण शिधापत्रिका तयार बदलून ई-शिधापत्रिका करण्यात आल्या आहेत. ई-शिधापत्रिकाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोनेवाडी गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. हे गाव इतर गावांसाठी आदर्शवत ठरले आहे.
- विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड
