Shet Mal Kharedi : हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीन, मूग व उडिद पिकांची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविण्याकरीता केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. केंद्र शासनाने सोयाबीन, मूग, उडिद खरेदी मंजूरी दिली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करावयाचा आहे, अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी, ३० डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
हमीभाव योजनेंतर्गत दिनांक ३० ऑक्टोबर, २०२५ पासून ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. १५ नोव्हेंबर, २०२५ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील ९० दिवसांसाठी खरेदी सुरू करण्यात यावी. त्याकरीता आपल्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यकृत बाबींनुसार गेल्या दहा वर्षांत किमान आधारभूत किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राने ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीनची विक्रमी खरेदी केली होती. यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनच्या एमएसपी मध्ये ₹४३६ प्रती क्विंटल वाढ करुन ₹ ५,३२८ केली आहे.
तसेच उडीद एमएसपी ७ हजार ८०० आणि मूगसाठी ८७६८ रुपये केली आहे. या वर्षी मूग खरेदीचे ३.३० लाख क्विंटल, उडीद खरेदीचे ३२.५६ लाख क्विंटल आणि सोयाबीन खरेदीचे १८.५० लाख मेट्रिक टन असे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट आहे. शेतकरी विक्रीस आणेल त्या सर्व सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या मोठ्या प्रमाणात खरेदीचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याचे पणनमंत्री रावल यांनी सांगितले.
सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 
- जयकुमार रावल, पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य 
 
