वाशिम : खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून, कृषी विभागाने रब्बी पेरणीचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख ३४ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित असून, त्यामध्ये हरभरा व गहूचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. तसेच, चिया, करडी, मोहरी, मका आणि नाविन्यपूर्ण पिकांवरही शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.(Rabi crop)
रब्बी पिकांचे नियोजन
कृषी विभागाने यंदा पावसाळ्यामुळे सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे लक्षात घेऊन रब्बी क्षेत्र वाढविण्याचे अंदाज वर्तविले आहेत. जिल्ह्यातील प्रकल्प, विहिरी व शेततळ्यांमध्ये जलसाठा तुडुंब असल्यामुळे, शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयीस्कर परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रस्तावित रब्बी पिक क्षेत्र (हेक्टर)
हरभरा : ८३,०००
गहू : ३९,५००
रब्बी ज्वारी : १,२००
चिया : ३,६५०
करडई : १,१००
मोहरी : ४५०
मका : १००
राजमा : १००
जवस : ७५
जिल्ह्यातील पारंपरिक पिकांबरोबरच नाविन्यपूर्ण पिकांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. चिया व करडईचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहिमाही राबवली आहे.
हरभरा व गहू पिकांवर भर
दरवर्षी रब्बी हंगामात हरभरा व गहू हे प्रमुख पिकं राहतात. यंदाही या दोन पिकांचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. गेल्या दोन वर्षांत मुबलक जलसाठ्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे.
यंदा सरासरीपेक्षा ३५% अधिक पाऊस झाल्याने, कृषी विभागाने १ लाख ४५ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले असून, प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी होण्याची शक्यता आहे.
नाविन्यपूर्ण पिकांवर भर
करडई : मागील काही वर्षात क्षेत्र कमी झाले होते; यंदा १,१०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन.
चिया : गतवर्षी ४,६०८ हेक्टरवर पेरणी झाली; यंदा ३,६५० हेक्टरवर नियोजन.
राजमा आणि जवस : यंदा अनुक्रमे १०० आणि ७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची योजना.
या पिकांसाठी शेतकऱ्यांना जनजागृती आणि प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून पिकांच्या उत्पादनात वाढ होईल.
रब्बी हंगामात पीक पेरणीचे नियोजन पूर्ण झाले आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा व त्याखालोखाल गहू पिकाची होईल. करडई व चिया पिकाखालील क्षेत्रातही वाढ करण्याचे प्रयत्न आहेत.- संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम
