सय्यद लाल
बाजार सावंगी, टाकळी राजेराय आणि लगतच्या गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून बटाटा लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. (Potato Cultivation)
कमी कालावधीत तयार होणारे, कमी खर्चात येणारे आणि तुलनेने स्थिर उत्पन्न देणारे पीक म्हणून बटाट्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून यंदा सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावर बटाट्याची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.(Potato Cultivation)
बाजार सावंगी व टाकळी राजेराय परिसरात सध्या बटाटापीक जोमात असून, वातावरण अनुकूल असल्यामुळे वाढ समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. राजेराय, कनकशिळ, वढोद, सुलतानपूर आणि येसगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बटाटा लागवड करण्यात आली आहे.(Potato Cultivation)
मक्यानंतर दुसरे नगदी पीक म्हणून बटाट्याची निवड
या परिसरात बहुतांश शेतकरी खरीप हंगामात मक्याचे पीक घेतात. मका काढणीनंतर दुसरे पीक म्हणून बटाटा घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे एकूण उत्पादन आणि उत्पन्न वाढत आहे.
बटाट्याचे पीक साधारण दोन महिने ते अडीच महिन्यांत काढणीला येते, त्यामुळे पुढील हंगामासाठी जमिनीची मशागत आणि नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
कमी कालावधी, कमी खर्च; नफ्याची शक्यता अधिक
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात आणि तुलनेने कमी खर्चात येणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. योग्य वाणाची निवड, खतांचे संतुलित नियोजन आणि वेळेवर कीड-रोग नियंत्रण केल्यास बटाट्यापासून चांगला नफा मिळू शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
योग्य वाणाची निवड, खतांचे योग्य नियोजन आणि लागवडीपासून काढणीपर्यंत शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब केल्यास बटाटा हे पीक आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरते. सध्या वातावरण अनुकूल असल्याने उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे.- ज्ञानेश्वर तारगे, तालुका कृषी अधिकारी
मका काढणीनंतर दोन एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली आहे. पीक चांगले आले असून, बाजारात योग्य दर मिळाल्यास चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा आहे.- समद पटेल, शेतकरी
आर्थिक आधार ठरणारे पीक
सध्या बाजार सावंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी बटाटा हे पीक महत्त्वाचा आर्थिक आधार ठरत आहे. कमी कालावधीत तयार होणारे, बाजारपेठेत मागणी असलेले आणि जोखीम तुलनेने कमी असलेले हे नगदी पीक भविष्यात आणखी क्षेत्र वाढवण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करत असल्याचे चित्र आहे.
