PM Kisan Hafta : देशातील काही भागात महापुराने थैमान घातले आहे. यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. मात्र केवळ पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील शेतकऱ्यांना पीएम किसानचा हफ्ता जाहीर करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील मराठवाड्यात पुराने थैमान घातले आहे. शेती पिकांसह घरादाराचे नुकसान झाले आहे. या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे मोल मिळावं, यासाठी इथला शेतकरी धडपड करतो आहे. अशात पीएम किसान योजनेच्या २१ व्या हफ्त्याचे वितरण करण्यात आले आहे. मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी भवनातून पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसाठी २१ वा हप्ता जमा केला.
पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ५४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळाली आहे. यासह, लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. ज्या पद्धतीने या तीन राज्यामध्ये नुकसान झाले आहे. याच पद्धतीने महाराष्ट्रातही मोठं नुकसान झाले आहे. मग महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुजाभाव असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मराठवाडा पुराने उध्वस्त
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे मराठवाडा प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी घरे आणि शेती उध्वस्त झाली असून, शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर असून अनेकांना विस्थापीत व्हावे लागले आहे. येथील शेतकऱ्यांनाही मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पाउले उचलत मदत करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.