नाशिक :शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग राबवून चार पैसे कसे पदरात पडतील यादृष्टीने शेतात पिके घेत असतो. काही वेळेस तोटा होतो तर काही वेळेस नफा होतो.
गेले वर्षभर उन्हाळ कांदा ठेवून त्यातून खर्च देखील वसूल न झालेल्या कोटमगाव खुर्द येथील शेतकरी गणेश कोटमे यांनी कांद्याला फाटा देऊन पपई पीक घेण्याचा निर्णय घेतला.
आज पपईचे उत्पादन सुरू असून पपईला आज साधारणपणे सहा ते सात हजार रुपये टनापर्यंत बाजारभाव मिळत आहे. एका पपईची पाच ते सात रुपये विक्री होत आहे. पपईचे एकरी उत्पादन साधारणपणे ४० टनापर्यंत निघते. अडीच एकरातून कोटमे यांना शंभर टन उत्पादन निघण्याची आशा असून चाळीस टन पपई सहा ते सात हजार रुपये दराप्रमाणे विक्री केली आहे.
भविष्यात नफ्याची आशा..
म्हणावा असा नफा निघत नसला तरी शेतात नवीन प्रयोग करून अजून पुढील दिवसात पपईला बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. अडीच एकराला साधारणपणे दीड लाखाच्या आसपास खर्च केला आहे. नऊ महिन्यानंतर उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे आता थोड्या प्रमाणात तोटा येत असला तरी पुढील उत्पादनात नफा मिळण्याची आशा त्यांना आहे.
यावर्षी कांद्यातून खर्च देखील वसूल झालेला नाही. त्यामुळे शेतात नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. अडीच एकरात २५०० पपईची लागवड केली. आठ महिन्यांपासून खते, औषधांची निगा राखून उत्पादन सुरू झाले आहे. पपईला साधारणपणे दहा, अकरा हजार रुपये टनांपर्यंत बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे. पुढील काळात बाजारभाव वाढून चार पैसे मिळण्याची आशा आहे.
- गणेश कोटमे, शेतकरी, कोटमगाव खुर्द, ता. येवला
