Orange Farming Problem : निसर्गाचा लहरीपणा, वाढते तापमान, दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावत आणि अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विदर्भात संत्रा व मोसंबी बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फूलगळ आणि फळगळ होत असल्याचे चित्र दिसत आहे. (Orange Farming Problem)
विशेषतः आंबिया बहारातील फळांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. (Orange Farming Problem)
कृषी तज्ज्ञांच्या मते हवामानातील बदल, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
संत्रा आणि मोसंबी पिकाला प्रामुख्याने मृग बहार आणि आंबिया बहार असे दोन बहार येतात. कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार आंबिया बहारात एका झाडावर जवळपास ३० हजार फुले येऊ शकतात. मात्र त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ४ टक्के फळे टिकून राहतात.
याउलट मृग बहारात फुलांची संख्या कमी असली तरी ५ ते ५.५ टक्के फळधारणा टिकते. मात्र सध्याच्या बदलत्या हवामानामुळे हे प्रमाण आणखी घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तापमानातील तफावतीचा परिणाम
फेब्रुवारी-मार्च महिन्यात फळधारणा झाल्यानंतर अचानक तापमान वाढू लागते. दिवसा तीव्र उन्हाचा तडाखा आणि रात्री गारवा यामुळे झाडांवर ताण निर्माण होतो.
एप्रिल महिन्यात येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे कोवळी फळे झाडावर टिकू न शकल्याने मोठ्या प्रमाणात गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढते.
पाण्याचे नियोजनही महत्त्वाचे
फळधारणेनंतर संत्रा झाडांना नियमित पाणी देणे अत्यावश्यक असते. मात्र उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास किंवा जमिनीत जास्त पाणी साचल्यास झाडांच्या मुळांना इजा होऊन फळगळ सुरू होते. चुकीच्या पद्धतीने दिलेले पाणी बुरशीजन्य रोगांना देखील आमंत्रण देते. त्यामुळे बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
तज्ज्ञांच्या मते संत्रा-मोसंबी बागांमध्ये फायटोप्थोरा आणि अल्टरनेरीया या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच रस शोषण करणाऱ्या पतंगांमुळे फळांचे नुकसान होते. अशा फळांमध्ये आतून सड दिसून येते आणि फळ कापल्यावर काळा पट्टा दिसणे हे त्याचे प्रमुख लक्षण मानले जाते.
अन्नद्रव्यांची कमतरता
संत्रा झाडांना केवळ पाणी पुरेसे नसून जमिनीत चुना, जस्त व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास झाडांची फळ टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते. तसेच नैसर्गिक संजीवकांचा अभावही फळगळ वाढवतो.
योग्य व्यवस्थापनाची गरज
कृषी तज्ज्ञांच्या मते बागेचे योग्य व्यवस्थापन, बोर्डो मिश्रणाची फवारणी, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि सुकलेल्या फांद्या काढून टाकणे या उपाययोजनांमुळे फळगळ काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. तसेच पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करणेही आवश्यक आहे.
विदर्भातील अनेक भागांत संत्र्यांची आवक सध्या कमी असून या समस्येमुळे पुढील हंगामातही संत्र्याचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा : Lemon Market : उन्हाळ्याची सुरुवात आणि लिंबाचा दर गगनाला; पुढे अजून महागणार?
