Orange Clean Plant Centre : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. नागपुरात तब्बल ७० कोटी रुपये खर्चून संत्र्याचे अत्याधुनिक 'क्लीन प्लांट सेंटर' स्थापन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. (Orange Clean Plant Centre)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. (Orange Clean Plant Centre)
संत्रा क्लीन प्लांट सेंटर म्हणजे काय?
या केंद्रामध्ये रोगमुक्त, उच्च-गुणवत्तेची रोपे, संत्र्याच्या नवीन वाणांचे संशोधन, नर्सरीसाठी मानक तंत्रज्ञान, ऑरेंज बेल्टसाठी सुधारित लागवड तंत्र उपलब्ध होणार असून यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे.
नर्सरींना मोठी आर्थिक मदत
केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना चांगल्या, निरोगी रोपांमुळेच चांगले उत्पादन मिळू शकते. त्यामुळे देशभरातील नर्सरींना आर्थिक सहाय्य दिले जाईल.
मोठ्या नर्सरीला : ४ कोटी रुपये
लहान नर्सरीला : २ कोटी रुपये
तसेच, शेतकरी सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहिण' योजना लखपती बहिण बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
दालमिलसाठी सबसिडी
दालमिल सुरू करण्यासाठी सरकार २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
शेतात पाणी साचणे, वन्यप्राण्यांमुळे नुकसान आता या दोन्ही नुकसानींचा समावेश करण्यात आला असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे केंद्र होणार : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, स्पेनप्रमाणे फार्मर बिझनेस स्कूल भारतातही तयार होणार आहे. अमरावती रोडवरील कृषी विद्यापीठात सुरू होणारे अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर जागतिक दर्जाचे असेल. येथे शेतकऱ्यांना व्यवसायिक प्रशिक्षण, मार्केटिंग, मूल्यवर्धन याबाबत नवीन मार्गदर्शन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास वेगवान होईल.
राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य मिळणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जातात. पण राज्य सरकार संपूर्ण सहकार्याला तयार आहे.
* चांगले वाण, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय अंगीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.
* कृषी संजीवनीसारख्या योजनांद्वारे राज्य शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल,सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. राजकुमार बडोले, आ. चरणसिंग ठाकूर, एनडीडीबी अध्यक्ष डॉ. मिनेश शाह, एसएमएल कोमल शहा, नागपूर विद्यापीठ व कृषी विद्यापीठातील अधिकारी यांची उपस्थिती होती.
विदर्भासाठी मोठा टर्निंग पॉईंट
नागपूरमध्ये सुरू होणारे संत्रा क्लीन प्लांट सेंटर, अॅग्रो बिझनेस स्कूल, नर्सरी अनुदान आणि सुधारित पीक विमा या सर्व उपक्रमांमुळे विदर्भातील संत्रा पट्टा आणि संपूर्ण शेती क्षेत्रासाठी हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.
