नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास सुरुवात झाली असून गेल्या तीन दिवसांत ६० टक्के बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत जमा झाली आहे.
जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ७४ शेतकऱ्यांचे २ लाख ८८ हजार ८०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी ३१७ कोटी १५ लाख ७७ हजार रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाले असल्याची माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी दिली.
साधारण दिवाळीतील भाऊबीज या सणापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात करण्यात आली. याद्या अपलोड करण्याचे काम लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत पूर्ण करण्यात आले होते. पुढच्या दोन दिवसात सर्वच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे
निधी वळती न करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांचे थकीत कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाल आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या यादीची पडताळणी केली होती.
माझे एक एकरवरील मका पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. दोन दिवसांपूर्वी बँक खात्यावर २५०० रुपये इतकी भरपाई जमा करण्यात आली. रक्कम जमा झाल्याचा बँकेचा मेसेज आल्यावर शासनाकडून भरपाई मिळाल्याचे समजले. मात्र ही भरपाई तटपुंजी स्वरुपाची आहे.
- ज्ञानेश्वर ढिकले, बाधित शेतकरी, सिद्धपिंप्री
