Nashik Onion Farmers : 'शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करू द्या आणि व्यापारी बांधवांना चांगल्या पद्धतीने व्यापार करू द्या. जर ही प्रक्रिया सरकारला खराब करायची असेल आणि ग्राहकांना स्वस्तात कांदा विकायचा असेल तर आम्ही कांद्याची शेती बंद करतो. आम्हाला कांदा शेती बंद ठेवायचे, एकरी दोन लाख रुपये दरवर्षी आमच्या खात्यावर पाठवा, मग सरकारने कांदा पिकवावा, तो ग्राहकांना फुकट वाटावा', अशा शब्दांत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांनी सरकारला जाब विचारला.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा, यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
भारत दिघोळे यांनी सांगितले म्हणाले की “केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधील कांद्याची देशभरातील शहरांमध्ये स्वस्त दरात विक्री केल्यामुळे बाजारात थेट स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर कोसळले आहेत. शेतकरी अडचणीत आहेत, आणि त्यांचा कांदा उत्पादन खर्चही वसूल होत नाही.”
बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला मिळणारे दर —
- किमान भाव : ८०० प्रति क्विंटल
- सरासरी भाव : १००० प्रति क्विंटल
- जास्तीत जास्त भाव : १२०० प्रति क्विंटल
उत्पादन खर्चाचा न्याय मिळत नाही
तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तब्बल २५०० प्रति क्विंटल इतका आहे. या तुलनेत बाजारभाव हा निम्म्याहून कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा न्याय मिळत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून सरकारकडे ठोस मागण्या मांडल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांचा आवाज दुर्लक्षित केला, तर राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा विक्रीविरोधात ठराव
यावेळी बैठकीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे ठराव करण्यात आला की “केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला न्याय्य दर मिळेपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून बाजारात कांदा विक्री करू नये.
तसेच, या दोन्ही संस्थांची कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद करावी.”
राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
सिन्नर येथून आजपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे आणि पदाधिकाऱ्यांची टीम राज्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांविरोधात एकत्रित जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.