नाशिक : नाफेड या केंद्रीय संस्थेला कांदा देऊनही पाच महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील २४०० शेतकऱ्यांचे १०५ कोटी रुपये पेमेंट अदा झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या २५० शेतकऱ्यांनी नाशिक शहरातील नाफेडच्या कार्यालयावर सोमवारी धड़क दिली. कर्मचारी व अधिकाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयास कडी ठोकली.
शेतकऱ्यांनी नाफेड विरोधात घोषणा दिल्या. सात तास आंदोलन चालले. शेतकऱ्यांनी कार्यालय आवारातच दुपारचे जेवण मागविले. पेमेंट केव्हा देणार? याचे लेखी उत्तर दिल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. सकाळी १० वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी सहा वाजता आश्वासनानंतर संपले.
नाफेडने जिल्ह्याभरात जेव्हा कांदा खरेदी केंद्र सुरू केले, तेव्हा डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे ७२ तासांच्या आत आधार जोडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन नाफेडच्या दिल्लीतील तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु जुलैपासून पुढील पाच महिन्यांचे थकीत पेमेंट शेतकऱ्यांना कांदा विक्री करूनही अदा झालेले नाही.
अधिकारी केवळ आश्वासन देत राहिले. अखेर शेतकऱ्यांनी सोमवारी द्वारका येथील नाफेडचे कार्यालय गाठले अन् शाखा व्यवस्थापक पटनायक यांना जाब विचारला. जोरदार चर्चा सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. नंतर एक तास झाल्यावर पटनायक यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून बाहेरून शेतकऱ्यांनी बाहेरून कार्यालयाच्या दाराला कडी ठोकली.
नाफेडच्या निषेधाचा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आला. नाफेडच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर तातडीने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. नंतर शेतकरी तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाच्या खाली उतरले अन् तेथे पुन्हा ठिय्या आंदोलन पुकारले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखले.
आता उद्याच्या बैठकीकडे लक्ष : अन्यथा आंदोलन
नाफेडचे शाखा व्यवस्थापक बी. एन. पटनायक यांनी नाफेडच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. थकीत पेमेंटबाबत बुधवारी बैठक होणार असून, त्यात पेमेंट देण्याची तारीख निश्चित केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यात निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
