नाशिक : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेले 'महाविस्तार एआय' या ॲपपचा वापर सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ११ हजार ८८८ शेतकरी नोंदणीकृत आहे. जिल्ह्यात मालेगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. मालेगावात सर्वाधिक १,६४९ शेतकरी या ॲपचा वापर करत आहेत.
शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून विविध गावांमध्ये जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य खतांचा वापर, उत्पादन खर्चात बचत आणि आधुनिक डिजिटल शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होणार आहे.
ग्रामीण भागात काही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मोबाइल हाताळणीचे कौशल्य आणि भाषिक अडथळे तसेच कृषी विभागाकडून ॲपला येणाऱ्या तांत्रिक अडचणी या कारणांमुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने या ॲपचा वापर करता येत नाही, अशी निरीक्षणेही समोर येत आहेत. त्यामुळे विभागाने प्रत्यक्ष भेटींद्वारे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सत्रे सुरू केली आहेत.
डिजिटल क्रांती की आव्हान?
'महाविस्तार एआय' ॲपमुळे शेतकऱ्यांना योजनांची, अनुदानांची आणि बाजारातील बदलांची माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी शासनाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले कृषी विषयक इतर ॲपमधील तांत्रिक त्रुटी सोडवण्यात अद्याप यश आलेले नाही.
डिजिटल शेतीकडे वाटचाल
ॲप रिअल टाइम बाजारभाव, हवामान अंदाज, पिकांची लागवड, खतांचा वापर, रोगनिदान आणि जैविक शेतीचे मार्गदर्शन मराठी भाषेत उपलब्ध करून देते. सदर ॲपमधून महाडीबीटी आणि पोक्रा योजनांतर्गत अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण ११ हजार ८८८ शेतकरी, तर मालेगावात १,६४९ नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. जिल्ह्यात मालेगावनंतर त्र्यंबकेश्वर (१,०७९), बागलाण (९२६), चांदवड (९१८), दिंडोरी (९०६), निफाड (७४९), सुरगाणा (७२९), येवला (७०१), नांदगाव (६५८), कळवण (६५५), इगतपुरी (६३८), पेठ (५८७), नाशिक ग्रामीण (४६४) आणि देवळा (३३६), अशा क्रमाने नोंदणी झाली आहे.
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'महाविस्तार एआय' ॲप डाउनलोड करता येते. याद्वारे शेतकरी स्थानिक हवामान अंदाजानुसार पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना, शासकीय अनुदान आणि विमा योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते.
- भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी
