अमरावती : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणारी 'मधाचे गाव' योजना सुरुवातीलाच आर्थिक घोंगड्यात अडकली आहे. (Madhache Gaon Yojana)
राज्यातील दहा गावांची निवड करून पहिल्या टप्प्यात हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या गावांना मंजूर निधी अद्याप वितरीत न झाल्याने योजना कागदावरच अडकली आहे. (Madhache Gaon Yojana)
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आमझरी यासह राज्यातील नऊ जिल्ह्यांतील प्रत्येकी एका गावाचा यात समावेश असून, एक वर्ष उलटूनही निधी न मिळाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. (Madhache Gaon Yojana)
मधाचे गाव संकल्पना आणि उद्देश काय?
२०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाने मधपालन आणि परागसिंचन विकासाला चालना देण्यासाठी 'मधाचे गाव' ही अभिनव संकल्पना जाहीर केली.
उपक्रमांतर्गत प्रत्येक निवडलेल्या गावासाठी मधमाशी पेट्या, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, प्रक्रिया केंद्र उभारणे, उत्पादनाचे मार्केटिंग व विक्री अशा संपूर्ण साखळीची निर्मिती करणे अपेक्षित होते.
निधी मंजूर… पण गावांत पोहोचला नाही!
पहिल्या टप्प्यातील गावांसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे.
आमझरी (अमरावती) – ४९ लाख रुपये
सिंधीविहीर (वर्धा) – ५४ लाख रुपये
तसेच अन्य गावांसाठीही समान निधी मंजूरी देण्यात आली.
फक्त निधी जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.
यामुळे प्रशिक्षण, प्रक्रिया केंद्र उभारणी, पेट्या पुरवठा यांसारखी कोणतीही कामे सुरू होऊ शकलेली नाहीत.
दुसऱ्या टप्प्यातील गावांचे प्रस्तावही रखडले
पहिल्या टप्प्याचा पैसा अडकलेला असतानाच दुसऱ्या टप्प्यातील गावांचे प्रस्तावही अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे प्रकल्पाचा गतीमानपणा पूर्णपणे कोलमडला आहे.मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत ग्रामस्थांची चिंता कायम आहे.
निधी लवकरच मिळेल
पहिल्या टप्प्यात निवडलेल्या दहा गावांना शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. लवकरच निधी गावांकडे उपलब्ध होईल. - प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी
शेतकऱ्यांची नाराजी
मनापासून प्रयत्न करून गावाची निवड झाली, प्रशिक्षणाची तयारी सुरू आहे, पण निधी न मिळाल्याने योजना कधी सुरू होणार? नियोजनात विलंब झाल्यास प्रकल्पाची विश्वासार्हताही धोक्यात येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडलेली १० गावे
| गाव | तालुका | जिल्हा |
|---|---|---|
| आमझरी | चिखलदरा | अमरावती |
| सिंधी विहीर | कारंजा घाडगे | वर्धा |
| घोलवड | डहाणू | पालघर |
| भंडारवाडी | किनवट | नांदेड |
| बोरझर | नवापूर | नंदुरबार |
| काकडदाभा | औढा नागनाथ | हिंगोली |
| उडदावणे | अकोले | अहिल्यानगर |
| चाकोरे | त्र्यंबकेश्वर | नाशिक |
| शेलमोहा | गंगाखेड | परभणी |
| सालोशी | महाबळेश्वर | सातारा |
गावागावात रोजगाराची संधी
'मधाचे गाव' योजनेमुळे ग्रामीण युवकांना रोजगार, शेतीसोबत उत्पन्न वाढ, मध उत्पादन, पॅकिंग आणि विक्रीची संपूर्ण साखळी, परागसिंचनामुळे पिकांचे उत्पादन वाढ असे अनेक फायदे होऊ शकतात. त्यामुळे योजना लवकर सुरू होणे अत्यावश्यक आहे.
